बुलढाण्यात सायबर गुन्हेगारांचा थरार!; शेतकऱ्याचे १० लाख ५१ हजार रुपये लंपास; मोबाईल हॅक करून लावला चुना!

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): जिल्ह्यात सायबर भामट्यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून, देऊळगाव राजा येथील एका शेतकऱ्याला तब्बल १० लाख ५१ हजार ६०२ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईल हॅक करून आणि ओटीपी चोरून अवघ्या २४ तासांत ही मोठी लूट करण्यात आली आहे.

देऊळगाव राजा येथील शनिवार पेठेत राहणारे सचिन विनायक जपे (वय ४५ वर्षे) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलमध्ये सायबर गुन्हेगारांनी शिरकाव केला. कोणत्याही प्रत्यक्ष संपर्काशिवाय, केवळ तांत्रिक क्लृप्त्या वापरून अज्ञात आरोपीने जपे यांचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर २६ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजेपर्यंत, म्हणजे केवळ ३५ तासांच्या कालावधीत, तक्रारदाराच्या बँक खात्यातून तब्बल १०,५१,६०२ रुपये टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या अनोळखी बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. विशेष म्हणजे, मोबाईल हॅक झाल्यामुळे तक्रारदाराला आलेले ओटीपी परस्पर गुन्हेगारांकडे फॉरवर्ड झाले आणि जपे यांना याची भनक लागण्यापूर्वीच त्यांचे खाते रिकामे झाले होते.

याप्रकरणी सचिन जपे यांनी सायबर पोलीस स्टेशन बुलढाणा येथे धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ (क) व ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील हे स्वतः करत असून, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

सायबर भामट्यांची ‘मोडस ऑपरेंडी’: सावध राहा!

या गुन्ह्यात आरोपींनी ‘मोबाईल हॅकिंग’ या सर्वात घातक मार्गाचा अवलंब केला आहे. व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे एखादी आकर्षक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकवर क्लिक करताच मोबाईलचा ताबा मिळवला. बँक व्यवहारांचे मेसेज तक्रारदाराला दिसण्यापूर्वीच गुन्हेगारांने स्वतःकडे वळवून घेतले, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

ही तर धोक्याची घंटा!

एका शेतकऱ्याने रक्ताचे पाणी करून कमावलेले १० लाख रुपये अशा प्रकारे लंपास होणे, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. सायबर पोलीस आता या पैशांचा माग काढत असून हे पैसे कोणत्या खात्यात गेले, याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, नागरिकांनी स्वतःहून सतर्क झाल्याशिवाय या ‘डिजिटल दरोडेखोरांना’ चाप बसणे कठीण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!