बुलढाणा,(प्रतिनिधी): आज शुक्रवारच्या नमाजवरून एकाच समाजातील दोन गटात आपसांत हाणामारी झाल्याची घटना शहरातील इकबाल चौकात आज घडली. यात दोन्ही गटातील ८ जण जख्मी झाले असून त्यातील ३ जण गंभीर आहेत. नमाज कोण पढेल? यावरून हा वाद झाला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांपासून इकबाज चौकातील जामा मशीदच्या ट्रस्टमध्ये अंतर्गत वाद सुरु आहेत. हाफीज रहमत हे मागील ३० वर्षांपासून याठिकाणी नमाज पठण करीत आहेत. परंतु ते आता वृद्ध झाले असून ते आजारी आहेत, म्हणून त्यांना नमाज पठणापासून रोखण्याचा मशीदचे ट्रस्टी इलियास कच्ची यांनी निर्णय घेतला असल्याचे समजते. या निर्णयाला परिसरातील लोकांनी विरोध दर्शविला.
आज, दुपारी नमाजच्या वेळेस हाफीज रहमत यांना ट्रस्टकडून विरोध झाला. त्यानंतर प्रारंभी वाद होऊन धक्काबुक्की झाली. यानंतर दोन गटात राडा झाला. २० ते २५ जणांनी हल्ला केल्याचे जख्मी कुरेशी परिवारांचे म्हणणे होते. दगड, लाठी-काठींसह हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील ८ जण जख्मी झाले आहेत. जख्मींमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. दानिश कुरेशी नाजीम कुरेशी वय १४, शेख साबीर शेख अफसर वय ४५, शेख मोईन शेख आकिब वय २२, शेख उमर शख जाकीर वय २१, शेख आदिब शेख साबिर वय १६, जाकिर शेख अफसर वय ५०, सैय्य तौफिस वय २८ आदिंवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पोलिसांची अतिरीक्त तुकडी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाली होती. याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.