अजय टप
मेहकर,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील शेंदला गावात एका अल्पवयीन मुलीला अडवल्याच्या कारणावरून विचारणा करण्यास गेलेल्या पित्यास तिघांनी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंदला येथील रहिवासी फिर्यादी बाळू रावशा भोसले (वय ३५ वर्षे) यांची मुलगी शायना ही ९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गावातील किराणा दुकानात जात होती. यावेळी गावातीलच रहिवासी आरोपी नितेश अंबादास पवार याने तिला रस्त्यात अडवून अडथळा निर्माण केला. मुलगी घरी परतल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला.
मुलीला का अडवले? याचा जाब विचारण्यासाठी बाळू भोसले हे आरोपीकडे गेले असता, किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी आरोपी नितेश पवार याने हातातील काठीने बाळू भोसले यांच्या हातावर, डाव्या भुवईवर आणि डोळ्यावर जबर प्रहार करून त्यांना जखमी केले. मारहाण सुरू असतानाच आरोपी सुनीलभाऊ तेजराव पवार हा देखील त्या ठिकाणी धावून आला आणि त्यानेही बाळू भोसले यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिसरा आरोपी तेजराव पवार याने घटनास्थळी येत फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “तू येथे कसा काय राहतो? तुला आणि तुझ्या परिवाराला आम्ही जिवानिशी मारून टाकू,” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी बाळू भोसले यांनी जानेफळ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नितेश अंबादास पवार, सुनीलभाऊ तेजराव पवार आणि तेजराव पवार (सर्व रा. शेंदला) यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५१ (२), (३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सावंत हे करीत आहेत.