बुलढाणा जिल्ह्यात गुन्हेगारीचा उद्रेक: ६१ लाखांची सायबर फसवणूक, राजकीय नेत्यांचा राडा आणि अंध तरुणावर अत्याचार!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): गेल्या २४ तासांत बुलढाणा जिल्हा हादरवून सोडणाऱ्या गुन्हेगारी घटना समोर आल्या आहेत. एका निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याची ६१ लाख रुपयांची ‘डिजीटल अटक’ करून फसवणूक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे राजकीय वैमनस्यातून आणि धार्मिक स्थळांवरील वादातून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. जळगाव जामोद, मलकापूर, देऊळगाव राजा आणि मेहकर परिसरात चोरी व वादाचे सत्र सुरूच असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

खळबळजनक: सायबर चोरट्यांनी मारला ६१ लाख ५० हजारांचा डल्ला

बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनमध्ये एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. मेहकर येथील ५७ वर्षीय रमेश श्रीराम आखरे यांना ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी आपल्या जाळ्यात ओढले. “तुमच्या नावाने मनी लाँड्रिंग झाले असून तुम्हाला डिजीटल अटक करण्यात आली आहे,” अशी भीती घालून आरोपींनी त्यांना २० मार्च ते ६ एप्रिल दरम्यान तब्बल ६१ लाख ५० हजर रुपये वेगवेगळ्या खात्यात भरण्यास भाग पाडले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध बीएनएस आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील करत आहेत.

बुलढाणा शहरात राजकीय नगरसेवकाचा राडा: वकिलाला मारहाण

बुलढाणा शहरातील जामा मशीद परिसरात नमाज पठणावरून आणि ट्रस्टच्या कामावरून मोठा वाद उफाळून आला. नगरसेवक जाकीर कुरेशी यांच्यासह १० जणांनी संगनमत करून वकील सय्यद तौफिक सय्यद खलील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण असून सपोनी युवराज रबडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माणुसकीला काळिमा: अंध तरुणावर अत्याचार

जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत मारोती पेठ येथे एक संतापजनक घटना घडली आहे. साखर आणण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय अंध तरुणाचा (गोविंदा कांबळे) तिघांनी विनाकारण पाय ओढून त्याला शिवीगाळ केली. अपंग व्यक्तींवरील अत्याचार कायद्यानुसार कडुबा सदावर्ते व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष

जिल्ह्यात शेतीच्या वादातून मारहाणीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रिधोरा येथे रस्ता आणि धुऱ्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचे आणि चावा घेतल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. एएसआय शरद बाठे या प्रकरणाचा तपास करत आहेत. धाड येथे जागेच्या जुन्या वादातून १० जणांच्या टोळीने एका कुटुंबाच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि जीवे मारण्याची धमकी दिली. बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोताळा येथे शेतीच्या वादातून दोन भावांनी मिळून एका तरुणाच्या नाकावर दगडाने प्रहार करून त्याला जखमी केले.

घरफोडी आणि चोरीचे सत्र

देऊळगाव राजा: आनंद येथील एका माजी सैनिकाचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मडाखेड येथून एका कंत्राटदाराचे ५५ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरट्यांनी पळवले. तर जलंब पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पहुरजिरा येथे चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याला “चुपचाप रहो, नही तो मार देंगे” अशी धमकी देऊन ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल लुटला.

मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई

जळगाव जामोद आणि मलकापूर शहर पोलिसांनी मद्यप्राशन करून सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या आणि वाहन चालवणाऱ्या आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली आहे. मलकापूर महामार्गावर झिग-झॅग पद्धतीने दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!