अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलढाणा शहर आणि परिसरातून दोन महिला बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका ६२ वर्षीय महिलेचा आणि एका १८ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या दोन्ही प्रकरणांची नोंद बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
पहिली घटना: गणेश नगरमधील ६२ वर्षीय महिला बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील गणेश नगर परिसरातून ६२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. हरीशचंद्र शंकर सपकाळ (वय ६९ वर्षे) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची पत्नी, आनंदीबाई हरीशचंद्र सपकाळ (वय ६२ वर्षे) या ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. बराच वेळ झाला तरी त्या घरी न परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूला आणि सर्व परिचित नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर ९ एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रकाश बाजड करत आहेत.
दुसरी घटना: तुळशी नगरमधील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
पहिली घटना ताजी असतानाच, १० एप्रिल २०२६ रोजी बुलढाणा शहरातील तुळशी नगर भागातून एका १८ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची दुसरी घटना घडली. नारायण श्रीराम सोनटक्के (वय ४० वर्षे) रा. तुळशी नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही बाब उघडकीस आली. त्यांची पुतणी, **विद्या गजानन सोनटक्के (वय १८ वर्षे) ही १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. परिसरात शोध घेऊनही ती न सापडल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. १० एप्रिल रोजी पोलिसांत या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार नामदेव खवले हे करीत आहेत.