मलकापूरजवळ भीषण अपघात: कारच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर, दोन्ही वाहने जळून खाक!

अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हायवे क्रमांक ५३ वर, गरेवार हॉटेलसमोर एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
वडनेर (ता.नांदुरा) येथील रहिवासी असलेले पांडुरंग ज्ञानदेव वानखेडे (वय ४१ वर्षे) हे १२ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकी क्रमांक एमएच-२८-एस-८८३९  वडनेरवरून मलकापूरकडे येत होते. दरम्यान, गरेवार हॉटेलसमोर मागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच-१९-ईपी-९५४८ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून वानखेडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, या अपघातात पांडुरंग वानखेडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही वेळातच कार आणि मोटारसायकल या दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. पाहता पाहता दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि त्यांचे मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी पांडुरंग वानखेडे यांच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (ब), ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. हायवेवरील वाढत्या वेगामुळे आणि निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांबाबत परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!