अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): एकीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी शेतकरी हैराण असतानाच, आता महावितरण आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चोरट्यांनी सुरू केले आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जांभुळधाबा आणि लोणवडी शिवारामध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारांवर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
६ एप्रिल २०२६ च्या रात्री ८ ते ७ एप्रिलच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी आपला ‘इंगा’ दाखवला. लोणवडी शेत शिवारातील डी.पी. वरील २९३ गाळ्यांच्या ३ फेज ४ वायर अशा एकूण ६,९६० मीटर तारा चोरट्यांनी शिताफीने कापून नेल्या. चोरट्यांचे मन एवढ्यावरच भरले नाही, तर त्यांनी जांभुळधाबा शिवार गाठून तेथील काशीनाथ मोरे यांच्या डी.पी. वरील ७,६८० मीटर आणि फिरके यांच्या डी.पी. वरील ३,८४० मीटर अशा एकूण १८,४८० मीटर ॲल्युमिनियम तारा चोरून नेल्या. या चोरीत महावितरणचे सुमारे ९०,००० रुपयांचे नुकसान झाले असून, चोरट्यांनी घाईघाईत तारा काढताना तब्बल १० सिमेंटचे विद्युत खांब (पोल्स) देखील जमीनदोस्त केले आहेत.
या प्रकरणी मलकापूर ग्रामीण ३ वितरण केंद्राचे प्रभारी कनिष्ठ अभियंता मंगेश प्रभाकर राणे यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सविता मोरे ह्या करीत आहेत. रात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात तारा कापून नेणे हे एखाद्या सराईत टोळीचेच काम असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
शेतकरी वर्गात संतापाची लाट
विजेच्या तारा चोरीला गेल्यामुळे शेतीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. हातात आलेली पिके वाळण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आम्ही रात्रंदिवस शेतात राबायचे आणि चोरट्यांनी अशा प्रकारे आमचे नुकसान करायचे, हे आता सहन करण्यापलीकडे आहे, अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आता पोलीस या ‘तारा’ चोरांच्या मुसक्या कधी आवळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.