पतीच्या रक्ताने माखले पत्नीचे हात; प्रियकरासोबत रचला होता ‘डेथ प्लॅन’!; मंगरूळ खून प्रकरणाचा २४ तासांत थरारक उलगडा

तुळजापूर,(प्रतिनिधी): अंधेरी रात्र… तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरचा तो निर्जन नटकल पूल… आणि शांतता चिरत जाणारा एका दगडाचा घाव! एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाला शोभेल असा थरार मंगरूळमध्ये प्रत्यक्षात घडला. पण या कथेचा शेवट पडद्यावर नाही, तर पोलीस कोठडीच्या लोखंडी गजांमागे झाला आहे. एका ३६ वर्षीय पतीचा काटा काढण्यासाठी २८ वर्षीय पत्नीने २० वर्षांच्या प्रियकरासोबत जो ‘डेथ प्लॅन’ रचला, तो वाचून तुमच्या अंगावर काटा येईल.

बुधवारी उजाडलं तेच एका भीषण बातमीने. नटकल पुलाच्या खाली एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. डोके दगडाने छिन्नविच्छिन्न केलेले, शरीरावर फरपटत नेल्याच्या खुणा. काही वेळातच मृताची ओळख पटली आणि मृतकाचे नाव कृष्णाथ आनंद साठे (वय ३६ वर्षे) रा. मंगरूळ असल्याचे समजले. गाव हादरलं! कुणीतरी बाहेरच्याने लूटमारीसाठी हा खून केला असावा, अशी चर्चा सुरू झाली. पण पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या नजरेला काहीतरी वेगळंच खुपत होतं.

जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी तपासाचे आदेश दिले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाचे जाळे विणले. पोलिसांनी सर्वात आधी कृष्णाथ यांच्या घराकडे धाव घेतली. तिथे पत्नी प्रतिभा साठे (वय २८ वर्षे) हिचा चेहरा विषण्ण होता, पण तिच्या डोळ्यांतील भीती आणि संशयास्पद शांतता पोलिसांच्या अनुभवी नजरेतून सुटली नाही. पोलिसांनी तांत्रिक तपासाचा ‘ब्रह्मास्त्र’ वापरला. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे डॉट्स जोडले जाऊ लागले. तेव्हा एक नाव वारंवार समोर येत होतं, ते म्हणजे शुभम घाटूळे (वय २० वर्षे).

पोलिसांनी जेव्हा प्रतिभा आणि शुभमला ताब्यात घेतलं आणि खाकीचा धाक दाखवला, तेव्हा या गुन्ह्याचा उलगडा काळजाचा थरकाप उडवणारा ठरला. २८ वर्षांची प्रतिभा आणि अवघ्या २० वर्षांचा शुभम यांच्यात गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते. या प्रेमाच्या आड कृष्णाथ साठे येत होते. मंगळवारच्या त्या काळरात्री, ठरल्याप्रमाणे कृष्णाथ यांना गाफील पकडण्यात आले. कोणत्याही दयामाया न दाखवता त्यांच्या डोक्यावर जड दगडाने प्रहार करण्यात आला. रक्ताचा सडा पडला, कृष्णाथ यांचा जीव गेला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह उचलून नटकल पुलाजवळ नेला. पुरावा लपवण्यासाठी त्यांनी तो मृतदेह फरपटत नेऊन अशा जागी टाकला की तो अपघाती मृत्यू वाटावा. या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील नात्यांच्या विणणीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. क्षुल्लक सुखासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी स्वतःच्या कुंकवाचा बळी घेणारी पत्नी आज समाजाच्या नजरेत गुन्हेगार ठरली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी संपूर्ण तुळजापूर तालुक्यातून होत आहे.

२४ तासांत ‘गेम ओव्हर’

आपण खूप हुशारीने हा कट रचला असा समज आरोपींचा झाला. पण विज्ञानाच्या युगात ‘क्राईम’ लपणं कठीण असतं. पोलिसांनी २४ तासांच्या आत मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने आरोपींची उपस्थिती घटनास्थळी सिद्ध केली. प्रतिभा साठे आणि तिचा प्रियकर शुभम घाटूळे यांना बेड्या ठोकल्या गेल्या. ज्या पत्नीने आयुष्यभर साथ देण्याची कसम खाल्ली होती, तीच आपल्या पतीच्या रक्ताने हात माखून पोलिसांच्या गाडीत बसली होती.

विशेष तपास पथकाची कामगिरी

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि त्यांच्या पथकाने दिवस-रात्र एक केली. सीसीटीव्हीचे शेकडो फुटेज तपासणे आणि संशयितांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, यामुळेच हा धक्कादायक खुलासा होऊ शकला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!