मलकापुरात चोरट्यांचा हैदोस! घरासमोर उभी केलेली बोलेरो पिकअप लंपास; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील शांतता पुन्हा एकदा गुन्हेगारांच्या दहशतीने भंग पावली आहे. प्रशांत नगर परिसरातून एका व्यावसायिकाची लाखो रुपयांची बोलेरो पिकअप अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केली. विशेष म्हणजे, भरवस्तीत आणि घरासमोरून गाडी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ‘मलकापुरात आता गाड्या सुरक्षित आहेत का?’ असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

मलकापूर शहरातील प्रशांत नगर, बिर्ला रोड येथील रहिवासी भवरलाल पन्नाराम गोडरा (वय ३३ वर्षे) हे कॅटर्सचा व्यवसाय करतात. व्यवसायासाठी त्यांनी जानेवारी २०२५ मध्ये महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच-२८-बीबी-८४९५) साडेतीन लाख रुपयांना खरेदी केली होती. आपल्या हक्काच्या कमाईतून घेतलेली ही गाडी ते नेहमीप्रमाणे घरासमोर उभी करायचे. ९ एप्रिल २०२६ रोजी रात्री त्यांनी गाडी घरासमोर पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जेव्हा ते उठले, तेव्हा त्यांना धक्काच बसला. घरासमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो गायब होती! गोडरा यांनी तातडीने परिसरात आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र गाडीचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

या चोरीप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोकडे हे करीत आहेत. एकीकडे पोलीस गस्त घालत असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे चोरटे बिनधास्तपणे घरासमोरून वाहने पळवून नेत आहेत. हा प्रकार सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकणारा आहे.

गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नाही का?

मलकापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची रात्रगस्त असतानाही चोरटे इतक्या हिमतीने चोऱ्या कशा काय करतात? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. एखाद्या कष्टकरी माणसाचे उदरनिर्वाहाचे साधन अशा प्रकारे चोरीला जाणे, हे केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!