संग्रामपूर,(प्रतिनिधी): संग्रामपूर तालुक्यातील औषध विक्रेत्यांवर मागील काही काळापासून होत असलेल्या आधारहीन आणि बदनामीकारक आरोपांमुळे केमिस्ट असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आमची बदनामी थांबली नाही, तर आम्ही औषध पेढ्या बंद करू,” असा इशारा संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तालुक्यातील औषध विक्रेते ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार २४ तास सेवा देत आहेत. बिलासह खरेदी-विक्री आणि औषध साठवणुकीचे सर्व नियम पाळले जात असतानाही, काही व्यक्तींकडून हेतुपुरस्सर बदनामी केली जात आहे. विशेषतः स्वप्निल देशमुख नामक व्यक्तीकडून ‘नशेची औषधे, गुंगी आणणारी औषधे आणि अवैध औषधांची विक्री’ होत असल्याचे खोटे आरोप लावून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
प्रशासनाकडून आरोपांचे खंडन
या आरोपांनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दोन वेळा कार्यशाळा घेऊन तालुक्यात सखोल तपासणी केली. मात्र, तपासात कोणतेही अवैध व्यवहार किंवा नशेची औषधे आढळली नाहीत. केवळ तांत्रिक व किरकोळ त्रुटींसाठी काही पेढ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. FDA चे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी स्पष्ट केले की, “तपासणीत झोपेच्या गोळ्या किंवा गर्भपाताची अवैध औषधे आढळलेली नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही पेढ्यांवर औषध सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० नुसार कारवाई करण्यात आली आहे.”
प्रशासकीय पाठबळ
या वादाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फार्मासिस्टच्या कामाचे कौतुक केले आहे. प्रशांत पाटील (तहसीलदार, संग्रामपूर) यांनी फार्मासिस्ट संघटनेवर होणारे आरोप दुर्दैवी आहेत. संघटनेने समाजहिताची भूमिका घेतली असून, त्यांनी आरोपांकडे दुर्लक्ष करून आपली आरोग्य सेवा सुरू ठेवावी, असे आवाहन केले आहे. चंद्रशेखर मारोडे (तालुका आरोग्य अधिकारी) यांनी जिथे डॉक्टर उपलब्ध नाहीत, तिथे फार्मासिस्ट आरोग्य यंत्रणेला मोलाची मदत करतात. ते आरोग्य सेवेतील महत्त्वाचा दुवा आहेत, असे म्हटले आहे.
संघटनेचा निर्वाणीचा इशारा
आम्ही सामाजिक आरोग्याची जबाबदारी जपत व्यवसाय करतो. खोटे आरोप करून समाजात विषमता निर्माण करणे थांबवावे. जर ही अवहेलना थांबली नाही, तर आम्हाला नाइलाजास्तव औषध पेढ्या बंद कराव्या लागतील आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील,” अशी ठाम भूमिका केमिस्ट असोसिएशनने मांडली आहे.