बुलढाणा,(प्रतिनिधी): शहरातील नागरी समस्यांचा डोंगर साचला असताना नगर परिषद प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत, प्रहार जनशक्ती पक्षाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहराला सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलन सोसा, असा स्पष्ट इशारा प्रहारचे जिल्हा उपजिल्हाप्रमुख अजय लक्ष्मण टप यांनी पत्राद्वारे दिला आहे.
प्रहारने निवेदनात म्हटले आहे की, शहरात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा चुराडा होत असताना प्रत्यक्षात मात्र सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, चालणेही मुश्कील झाले आहे. नियोजनशून्य कारभारामुळे मलकापूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १५-१५ दिवस वाट पाहावी लागत आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्याने जनतेला विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगर परिषदेचे हे ‘वॉटर मॅनेजमेंट’ आहे की सर्वसामान्यांची छळवणूक, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
केवळ नागरिकच नव्हे, तर नगर परिषदेचे कंत्राटी कामगारही प्रशासनाच्या जाचाला कंटाळले आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून या कामगारांचे पगार रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे गरीब कामगारांना वेठीस धरले जात असताना, दुसरीकडे अनेक मोठे अधिकारी बायोमेट्रिक हजेरी न लावता रजिस्टरवर सह्या करून नियमांना हरताळ फासत आहेत. या अधिकाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे? असा सवालही अजय टप यांनी विचारला आहे. शासकीय नियमानुसार दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे दिव्यांग बांधवांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने या समस्यांवर तोडगा काढावा. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यावेत आणि बायोमेट्रिक हजेरीचा नियम सर्वांना लागू करावा. जर लवकरच सुधारणा झाली नाही, तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ‘घागर पूजन’ आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अजय टप यांनी दिला आहे.