धामणगाव बढे हादरले! ९० वर्षीय वृद्धेवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला; अज्ञाताने अंधाराचा फायदा घेत चालवले सपासप वार

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शांत झोपलेल्या एका ९० वर्षांच्या वृद्धेवर अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने सपासप वार करून तिला मृत्यूच्या दारात ढकलण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून, “तो” अज्ञात हल्लेखोर कोण? आणि त्याने हे कृत्य का केले? या प्रश्नांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

दिनांक १६ एप्रिल २०२६ ची ती रात्र. झोपडपट्टी परिसरात सर्वत्र शांतता होती. संजय विश्वनाथ बढे यांचे कुटुंब नेहमीप्रमाणे आपल्या कामातून निवृत्त होऊन झोपी गेले होते. वाढत्या उष्म्यामुळे संजय यांची ९० वर्षांची वृद्ध आई, गं. भा. लक्ष्मीबाई विश्वनाथ बढे, घरासमोरील अंगणात झोपल्या होत्या. रात्रीचे साधारण ११ वाजत आले होते. गाव निद्रावस्थेत असताना अंधाराचा फायदा घेत एक सावली लक्ष्मीबाईंच्या खाटेजवळ सरकली. हातात चमकणारा धारदार चाकू आणि मनात खुनशी विचार घेऊन आलेल्या त्या अज्ञात इसमाने काही कळायच्या आत लक्ष्मीबाईंवर हल्ला चढवला.

या घटनेची माहिती मिळताच धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी संजय बढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बरारकर हे करत आहेत.

काळजाचा ठोका चुकवणारा हल्ला

हल्लेखोराने अत्यंत क्रूरपणे लक्ष्मीबाईंच्या उजव्या हाताच्या बरगडीजवळ, बगलेत आणि दंडावर चाकूने खोलवर वार केले. ९० वर्षांच्या त्या माऊलीला प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती, मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मीबाईंच्या वेदनादायी विव्हळण्याने शांतता भंग पावली. हल्ला केल्यानंतर आरोपीने क्षणात तिथून पळ काढला आणि अंधारात नाहीसा झाला.

रक्ताच्या थारोळ्यात आई; मुलाची धावपळ

संजय बढे यांना आईचा आवाज येताच त्यांनी बाहेर धाव घेतली. समोरचे दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत आई मृत्यूशी झुंज देत होती. तातडीने मदतीसाठी हाक मारत त्यांनी जखमी आईला रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून लक्ष्मीबाईंची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अनेक प्रश्न, उत्तरं अद्याप गुलदस्त्यात

हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की जुन्या वादातून? नऊ दशकांचे आयुष्य पाहिलेल्या एका हतबल वृद्धेवर इतक्या निर्घृणपणे वार करण्याचे कारण काय? हे प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. भरवस्तीत आणि घरासमोरच असा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!