“हापूसच्या पेट्यांमधून बिलांचा खेळ?”;अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नगरपालिकेत गोड व्यवहाराची चर्चा!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी):मलकापूर नगरपालिकेत अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एक “गोड” पण तितकीच संशयास्पद घटना चर्चेचा विषय ठरली आहे. शहरात सध्या रत्नागिरीच्या हापूस आंब्याचा सुगंध दरवळत असतानाच, नगरपालिका परिसरात मात्र या आंब्याच्या पेट्यांभोवती वेगळाच “व्यवहाराचा वास” येऊ लागला आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ नगरसेवकांनी स्वतःची प्रलंबित बिले मंजूर करून घेण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला रत्नागिरीच्या गोड हापूस आंब्याच्या पेट्या भेट दिल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेल्या या कथित देवाणघेवाणीमुळे “शुभ मुहूर्त की शंकेचा मुहूर्त?” असा सवाल आता उपस्थित होत आहे. नगरपालिका परिसरात या घटनेची कुजबुज इतकी वाढली आहे की, “बिले मंजूर होण्यासाठी आता फाईलसोबत आंब्याच्या पेट्यांचीही गरज लागते का?” असा उपरोधिक प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या प्रशासनावर या प्रकारामुळे संशयाची सावली पडताना दिसत आहे.

अधिकृत स्तरावर याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नसली तरी, नागरिकांमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. “गोड आंब्यांच्या आड कडू वास्तव दडलंय का?” हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? की हा विषयही आंब्यासारखाच हंगामी ठरून विस्मरणात जाणार?
याकडे संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!