लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचा डंका!;CBSE १० वीच्या परीक्षेत जिल्ह्यात ‘अव्वल’

लोणार,(प्रतिनिधी): लोणार येथील लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सीबीएसई १० वीच्या परीक्षेत सलग नवव्या वर्षी शाळेने घवघवीत यश मिळवले असून, यशिका कोठारी आणि उमेश शेटे यांनी जिल्ह्यातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, तर तृप्ती गजानन शिंबरे हिने ९५.८० टक्के गुण मिळवत तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण न होता, जिल्ह्याच्या मेरिट लिस्टमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामध्ये यशिका पवन कोठारी ९९ टक्के (बुलढाणा जिल्ह्यात प्रथम), उमेश रमेश शेटे ९८.८० टक्के (बुलढाणा जिल्ह्यात द्वितीय), तृप्ती गजानन शिंबरे ९५.८० टक्के (तालुक्यात तृतीय) स्थानी आहे. विशेष म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांनी कठीण विषयातही पैकीच्या पैकी गुण मिळवून सर्वांना थक्क केले.

माहिती तंत्रज्ञान (IT): तब्बल ११ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवले. मराठी:यशिका कोठारी, उमेश शेटे व अक्षरा जायभाये या तिघांनी १०० पैकी १०० गुण घेतले. सामाजिक शास्त्र: उमेश शेटे याने १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कामगिरी केली. एकूण ८७ विद्यार्थ्यांपैकी ७२ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, २२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले. तर तालुक्यातील टॉप २७ विद्यार्थ्यांमध्ये सर्व विद्यार्थी याच शाळेचे आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष शेख मसुद शेख उस्मान, प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, उपप्राचार्य नबिल शेख, समन्वयक अंकुश चव्हाण व संचालक मो. फैसल यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. या निकालामुळे लोणार तालुक्यात आनंदाचे वातावरण असून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!