अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांपासून ते भरधाव वाहनांच्या अपघातांपर्यंत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तामगाव, साखरखेर्डा, मलकापूर आणि देऊळगाव राजा परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
तामगाव: खेळणाऱ्या मुलाने फोम काढला म्हणून नातेवाईकांवर लोखंडी टॉमीने हल्ला!
तामगाव (संग्रामपूर): किरकोळ कारणावरून रागाचा पारा चढल्याने कवठळ येथे एकाच कुटुंबातील ८ जणांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या मुला-सुनेवर भीषण हल्ला केला. खेळणाऱ्या लहान मुलाने मंडप डेकोरेशनच्या गादीतून फोमचा तुकडा काढला, या साध्या कारणावरून संगीता पाखरे, राहुल पाखरे व इतर आरोपींनी लोखंडी टॉमीने फिर्यादीच्या मुलाच्या आणि सुनेच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. तामगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
साखरखेर्डा: तलाठी आणि ग्रामस्थांमध्ये रस्ते अपघातावरून तुंबळ हाणामारी!
साखरखेर्डा (सिंदखेडराजा): शेंदूर्जन शिवार परिसरात एका कार आणि बुलेटचा भीषण अपघात झाला. धक्कादायक म्हणजे, कार चालक श्रीकृष्ण अर्जुन निकम (तलाठी, मलकापूर पांग्रा) हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या अपघातात बुलेट चालक गंभीर जखमी झाला. मात्र, या घटनेला वेगळे वळण तेव्हा मिळाले जेव्हा दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले. तलाठी निकम यांनीही आरोप केला आहे की, अपघातानंतर आरोपी प्रभाकर कायंदे व इतरांनी त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
अंढेरा: पत्नीच्या आत्महत्येचा जाब विचारला म्हणून सासऱ्यावर दगडाने हल्ला!
अंढेरा: मुलीने सासरी आत्महत्या केल्यानंतर, तिचे चॅटिंग आणि व्हिडिओ का पाठवले? असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना आरोपी जावई प्रभू चाटे आणि त्याच्या भावाने बेदम मारहाण केली. आरोपीने आपल्या सासऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्यांना जखमी केले. कौटुंबिक वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
देऊळगाव राजा: विनापरवाना ‘छत्रपतींचा पुतळा’ बसवला; अज्ञातांवर गुन्हा!
देऊळगाव राजा: किन्ही पवार गावातील हनुमान मंदिराजवळ ग्रामपंचायतीच्या जागेत रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार केल्याने ग्रामपंचायत अधिकारी बाळकृष्ण तिडके यांच्या तक्रारीवरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामगाव: वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन आरोपी फरार; महसूल विभागाच्या कारवाईला धाबा!
तामगाव: वान नदीच्या पुलाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या महींद्रा ट्रॅक्टरला तलाठ्यांनी पकडले असता, आरोपी हासम शाह याने दीड ब्रास रेतीसह ट्रॅक्टर पळवून नेला. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि वाळू चोरीच्या कलमान्वये तामगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
धाड: शेतकऱ्यांच्या ३० हजारांच्या बकऱ्या लंपास!
धाड: तवक्कल नगर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी मोहम्मद मोईन यांच्या मालकीच्या तीन महागड्या बकऱ्या चोरून नेल्या. भरवस्तीतून बकऱ्या चोरीला गेल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या घडामोडी:
साखरखेर्डा (भाग २): किनगाव राजा रोडवर भरधाव दुचाकीने धडक दिल्याने ६० वर्षीय रमेश चाळसे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले असून त्यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत.
धामणगाव बडे: स्वतःचीच दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ४१ वर्षीय विजय पाटील यांचा मृत्यू झाला.
मलकापूर शहर: सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंधित तंबाखू आणि बिड्यांची विक्री करणाऱ्या शेख अजीमवर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला.
- बुलढाणा जिल्ह्याच्या अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा ‘हिंदवार्ता’ न्यूज पोर्टल!