https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

बुलढाणा जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचा उद्रेक! विनयभंग आणि खुनी हल्ल्याने जिल्हा हादरला; संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात खळबळ; ‘बावनबीर’मध्ये हात धरून विनयभंग, तर ‘तरोडा’मध्ये सून आणि पत्नीवर कुऱ्हाडीने वार!

अजय टप

संग्रामपूर,(प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या २४ तासांच्या अंतराने सोनाळा आणि जलंब पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांवरील अत्याचाराच्या दोन भीषण घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आला, तर दुसऱ्या घटनेत चक्क सासरा आणि पतीने मिळून महिलेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

बावनबीरमध्ये दिवसाढवळ्या विनयभंग; आरोपीने दिला जीवे मारण्याचा इशारा!

पहिली घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बावनबीर येथे घडली. २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एक ३० वर्षीय महिला आपल्या घरून भावाच्या घरी जात होत्या. त्या ‘गौमाता मंदिरा’जवळील वडाच्या झाडाखाली पोहोचल्या असता, दबा धरून बसलेल्या नराधमाने त्यांच्यावर झडप घातली. आरोपी श्याम श्रीकृष्ण फुलकर याने पीडित महिलेचा ‘वाईट उद्देशाने’ हात धरला आणि तिची छेड काढली. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने अत्यंत उद्दामपणे “जर कोणाला काही सांगितलेस, तर तुला जीवे मारीन” अशी धमकी दिली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४ आणि ३५१ (२) (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार रमेश खरात हे करीत आहेत.

नातेसंबंधांना काळिमा! सासऱ्याने पकडले कवठ्यात, तर पतीने कुऱ्हाडीने तोडला अंगठा!

दुसरी हृदयद्रावक घटना शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तरोडा डी येथे घडली. येथे रक्ताच्या नात्यानेच माणुसकीला काळिमा फासला आहे. एका ३० वर्षीय महिलेस तिच्याच सासरच्या मंडळींनी क्रूर वागणूक दिली. २२ एप्रिलच्या दुपारी १२ वाजता आरोपी सासरा पुंडलीक रामभाऊ मुंडे ( वय ६५ वर्षे) याने घरात घुसून सुनेला जबरीने ‘कवठ्यात’ (मिठीत) पकडले आणि कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने हिंमत करून ही घटना आपला पती अनिल पुंडलीक मुंडे याला सांगितली. मात्र, पत्नीला आधार देण्याऐवजी नराधम पतीने तिला शिवीगाळ करत चक्क कुऱ्हाडीने हल्ला केला!

या प्राणघातक हल्ल्यात कुऱ्हाडीचा वार पीडितेच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर बसला आणि त्या गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्या. याप्रकरणी पीडितेच्या जबानीवरून जलंब पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ३३३, ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नन्हेखा तडवी हे करीत आहेत.

जिल्ह्यात संतापाची लाट: नराधमांना कठोर शिक्षा होणार का?

एकीकडे शासन ‘लाडकी बहीण’ आणि महिला सुरक्षाच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात महिलांना रस्त्यावर चालणे आणि घरात राहणेही कठीण झाले आहे. बावनबीर आणि तरोडा येथील या दोन्ही घटनांनी गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. “महिलांनी अशा नराधमांविरुद्ध न घाबरता पुढे यावे आणि तक्रार करावी,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पोलीस या आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून देण्यात यशस्वी होतात का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!