अजय टप
शेगाव, (बुलडाणा): चारित्र्याचा संशय आणि १० लाख रुपयांच्या हुंड्यासाठी एका २९ वर्षीय विवाहितेचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘माझा मुलगा सरकारी नोकरीला आहे, तुझ्यापेक्षा सुंदर मुलगी आणि हुंडा मिळाला असता’ असे टोमणे मारत, सासरच्या मंडळींनी विवाहितेवर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. इतकेच नव्हे तर, पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये पतीसह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरावती येथील रहिवासी असलेल्या कोमल अजिंक्य गवळी (वय २९ वर्षे) यांचा विवाह अमरावती येथीलच अजिंक्य गवळी याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत असताना, पती अजिंक्य याने कोमल यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींनी ‘तुझ्या आई-वडिलांनी आमच्या अपेक्षेप्रमाणे हुंडा दिला नाही’ यावरून कोमल यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. कोमल यांच्या सासू-सासर्यांनी त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. ‘मुलगा सरकारी नोकरीला असल्याने अधिक हुंडा मिळाला असता’ असे म्हणत, त्यांनी कोमल यांच्याकडे माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणले तरच सुखाने नांदू देऊ, नाहीतर घटस्फोट घेऊ, अशी टोकाची भूमिका सासरच्यांनी घेतली. हुंड्याची मागणी पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या सासरच्या मंडळींनी क्रूरतेची सीमा ओलांडली. पती अजिंक्य, सासरा अनिल गवळी, सासू किरण गवळी आणि नणंद प्रगती भूषण गोरे यांनी संगनमत करून कोमल यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “पैसे आणले नाही तर तुला एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकू,” अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस अधिक्षक कार्यालय, बुलडाणा येथील ‘भरोसा सेल’ कडे तक्रार केली होती. चौकशीअंती प्राप्त झालेल्या पत्रावरून शेगाव शहर पोलिसांनी अजिंक्य अनिल गवळी, अनिल दत्तात्रय गवळी, किरण अरुण गवळी (सर्व रा. विश्वशांती नगर, अमरावती) आणि प्रगती भूषण गोरे (रा. नागपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार निलेश गाडगे करत आहेत.