अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांविरोधात विशेष कारवाई तीव्र केली आहे. मलकापूर, नांदुरा, खामगाव आणि बोराखेडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या २४ तासांत घरफोडीचा प्रयत्न, कौटुंबिक छळ, अवैध दारू, जुगार, कोटपा कायदा आणि ड्रंक अँड ड्राईव्हचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हुंड्यासाठी छळ आणि तीन तलाकची मागणी: पतीसह सासूवर गुन्हा
हिवरखेड: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखनवाडा येथे माहेरून कर्ज फेडण्यासाठी १५ लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ करत तीन तलाक देण्याचा आग्रह धरण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून व उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव यांच्या चौकशीअंती पती मोहम्मद रफीक मोहम्मद हमीद व सासू शमीमबानो (दोघे रा. लाखनवाडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, २९६, ११५(२), ३५२ सह मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहायक फौजदार आनंदा वाघमारे करत आहेत.
नागरिकांच्या सतर्कतेने चोरटे जाळ्यात
नांदुरा: खुमगाव बुट्टी येथे फिर्यादी सुलोचना सातव या सासूला डबा देण्यासाठी जात असताना एका बंद घराचे कुलूप तोडून बाहेर पडणाऱ्या अनोळखी इसमाला त्यांनी हटकले. चोरट्याने त्यांना चाकूचा धाक दाखवून पळ काढला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून अजय सुकलाल धर्मा (रा. कुवरदेव) व संजय नामदेव चिंचोळकर (रा. केलपाणी) या दोघांना एमएच-१९-एव्ही-३०५८ या दुचाकीसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सीसीटीव्ही फुटेजमुळे मोलकरणीचा पर्दाफाश
नांदुरा: येथील डागा ऑईल मिल परिसरातील कपाटातून ४५ हजार रुपये रोख व ७५ हजार रुपयांची १५ ग्रॅमची सोन्याची तुळशी माळ (एकूण १.२० लाख रुपये) चोरीला गेली होती. घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घरकामासाठी येणारी महिला शारदा अनंता तायडे ही कागदाच्या गुंडाळ्यात पैसे लपवून नेताना स्पष्ट दिसली. तिच्यावर गुन्हा नोंदवून तपास पोलीस अंमलदार सय्यद यांच्याकडे सोपवला आहे.
अवैध दारू जप्ती
नांदुरा: हद्दीत चांदुरबिस्वा शिवार येथे गजानन काळे (वय ५५ वर्षे ) याच्याकडून १६ बाटल्या देशी दारू (किंमत ६५० रुपये ) आणि बोराखेडी हद्दीत टाकरखेड शिवार येथे निंबाजी जाधव (वय ५० वर्षे) याच्याकडून ९ लिटर हातभट्टी दारू (किंमत ९५० रुपये) जप्त करण्यात आली.
वरली मटका जुगारावर धाड
पिंप्री अढाव: येथे विठ्ठल मंदिराच्या परिसरात वरली मटका जुगार चालवणाऱ्या निलेश अढाव (वय ३२ वर्षे) याला पंचांसमक्ष ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.
शाळेसमोर तंबाखू विक्री
मलकापूर: शहर येथे नगरपरिषद शाळेसमोर सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या शेख रफिक शेख रशीद याच्याकडून कोटपा कायद्यानुसार मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मलकापूर: शहरातील हनुमान चौकात दारूच्या नशेत अनियंत्रितपणे दुचाकी चालवणाऱ्या मारोती गवर (रा. बेलाट) याच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये कारवाई करण्यात आली.
शेतात गळफास
मलकापूर: तांदुळवाडी (ता. मलकापूर) येथे बाबुलाल रमेश करवरिया या तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी दसरखेड पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
खामगावातून महिला बेपत्ता
खामगाव: येथील गोपाल नगर परिसरात राहणारी एक ३५ वर्षीय महिला २० ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती आढळून आली नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस अंमलदार आगरकर करत आहेत.
