बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई: ॲट्रॉसिटी, प्राणघातक हल्ला आणि दारूबंदी कायद्यांतर्गत ४ गुन्हे दाखल

अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. मलकापूर ग्रामीण, धामणगाव बढे, जलंब आणि धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ॲट्रॉसिटी, प्राणघातक हल्ला, दारू पिऊन धिंगाणा घालणे आणि मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

धामणगाव बढे: धामणगाव बढे हद्दीतील उऱ्हा शेत शिवारात झाडाची तोडलेली फांदी रस्त्याच्या बाजूला टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून अमोल जना पाटील याने शेजारी राहणारे गजानन सूर्यवंशी यांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ करत जिवाने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) सह अ.जा.ज.प्र.का. (ॲट्रॉसिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा करत आहेत.
जलंब: ब्राह्मणवाडा माटरगाव येथे रस्ता अडवल्याच्या जुन्या वादातून ऋषिकेश देशमुख या तरुणावर त्याच्याच सख्ख्या चुलत भावांनी (सुरेश, राहुल, अक्षय आणि राम देशमुख) लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेशवर अकोला येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ११८(१), ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
धाड: येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एमएच २१-सीएच-९६३० या क्रमांकाची दुचाकी भरधाव व अनियंत्रितपणे चालवणाऱ्या लव मनोहर पानपाटील (वय २६ वर्षे), रा. भोकरदन, जि. जालना याला पोलिसांनी अडवले. वैद्यकीय तपासणीत तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले.
मलकापूर ग्रामीण: मलकापूर ग्रामीण हद्दीतील उमाळी येथे मरीमाता मंदिरासमोर दारूच्या नशेत धुमाकूळ घालणाऱ्या विजय वासुदेव निंबोळकर (वय ३३ वर्षे) रा. उमाळी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८५(१) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!