काटी येथील रक्ताळलेला थरार: ५२ वर्षीय वृद्धाचा जीव घेणारे दरोडेखोर अखेर जाळ्यात! मलकापूर पोलिसांचा खाकी दणका, आरोपींना ६ दिवसांची कोठडी

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): नांदुरा तालुक्यातील काटी गावात घरफोडी करून प्रतिकार करणाऱ्या ५२ वर्षीय वृद्धावर चाकूने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या करणाऱ्या नराधमांच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल १७ दिवसांनंतर मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन भयंकर दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्यांना ३१ ऑगस्टपर्यंत ६ दिवसांची कडक पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदुरा तालुक्यातील काटी गावात ९ ऑगस्ट रोजी अज्ञात दरोडेखोर घरफोडीच्या उद्देशाने शिरले होते. रात्रीच्या अंधारात चोरटे गावात शिरल्याचे दिसताच, गावचे रहिवासी रायसिंग सिताराम सोळंकी (वय ५२ वर्षे) यांनी जराही न घाबरता चोरट्यांना हटकले आणि त्यांचा पाठलाग केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या चार नराधम दरोडेखोरांनी रायसिंग सोळंकी यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. धारदार चाकूने सपासप वार करून सोळंकी यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि दरोडेखोर पसार झाले. उपचारादरम्यान सोळंकी यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची लाट पसरली होती. निलेश शिवराम सोळंके (वय ३० वर्षे) यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांत बीएनएसच्या कलम १०३ (१), ३३१ (८), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपवण्यात आली होती. पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे धागेदोरे जुळवत २५ ऑगस्ट रोजी संतोष शिवबासअप्पा पवार (वय २५ वर्षे) रा. लालगोटा मदापुरी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव, दिनेश तुकाराम चव्हाण (वय २५ वर्षे), रा. डेबुजी नगर, राहटगाव, जि. अमरावती, ह.मु. पुर्णाळ फाटा, ता. मुक्ताईनगर या मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी!
आज २६ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना मलकापूर न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची गरज लक्षात घेता न्यायालयाने दोन्ही आरोपींची ३१ ऑगस्टपर्यंत (६ दिवस) पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या हत्येतील उर्वरित फरार आरोपींचा शोध आता पोलीस कोणत्या थराला जाऊन घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!