मलकापूर हादरले! दुधलगाव येथील शेतमजूर महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा उलगडा; मध्य प्रदेशातील दोन नराधमांच्या मुसक्या आवळल्या!! २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):तालुक्यातील दुधलगाव बु. शिवारात शेतात झोपलेल्या एका १९ वर्षीय पीडित आदिवासी शेतमजूर महिलेवर धारदार शस्त्राचा धाक दाखवून अत्यंत निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना मलकापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. २६ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य प्रदेशातून या नराधमांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २९ ऑगस्टपर्यंत (४ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.
मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दुधलगाव बु. येथील संजय भारंबे यांच्या लोणवडी शिवारातील शेतात मध्य प्रदेशातील आदिवासी पावरा कुटुंब मजुरीसाठी वास्तव्यास होते. १७ जुलैच्या मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास १९ वर्षीय पीडित महिला आपल्या पतीसोबत झोपडीत मोबाईल पाहत झोपलेली असताना, दोन अनोळखी इसमांनी हातात कोयता आणि विळ्यासारखी घातक शस्त्रे घेऊन अचानक आत प्रवेश केला. शस्त्राचा धाक दाखवून आरोपींनी दांपत्याकडे पैशांची मागणी केली. पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने या नराधमांनी पतीला धमकावून बाजूला केले आणि पीडित तरुणीला बळजबरीने झोपडीबाहेर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(१), ७०(१), ३०९(४), ३११, ३३३, ३५१(२), (३), आणि ३(५) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांची विशेष मोहीम आणि आरोपींना बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून २६ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातून राकेश महेंद्रसिंग भिलाला (वय २२ वर्षे) रा. जामठी, ता. जि. बऱ्हाणपूर, म.प्र. आणि जामसिंग रोशन भिलाला (वय २२ वर्षे) रा. जामठी, ता. जि. बऱ्हाणपूर, म.प्र. या दोन संशयितांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या घटनेचा पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!