अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): बुलडाणा जिल्ह्यात सध्या सर्वसामान्यांनी जगावे कसे आणि आपली मालमत्ता सांभाळावी कशी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे पोलीस प्रशासन ‘आम्ही तुमच्या रक्षणार्थ’ असे सांगत असताना, दुसरीकडे चोरांनी मात्र पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपला ‘धंदा’ जोरात सुरू केला आहे. जळगाव जामोद तालुक्यातील शेळ्या-मेंढ्यांची चोरी असो वा मलकापूर शहरातील दुचाकींची पळवापळवी; चोरांनी सध्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बकरी चोरीचा ‘हायटेक’ फंडा: गरिबांच्या तोंडचा घास पळवला!
जळगाव जामोद तालुक्यातील मालठाणा येथील एका गरीब शेतमजुराच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या सात मुक्या प्राण्यांवर चोरांनी डल्ला मारला. सुरेश नानसिंग डिमके या आदिवासी बांधवाचे ४१ हजार रुपयांचे पशुधन अज्ञात चोरांनी गाडीत टाकून लंपास केले. निभोरा फाट्यासमोर ही घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा पोलीस गस्त घालण्याचे दावे केले जातात, त्याच वेळी चोरटे आरामात गाडी घेऊन येतात, सात बोकड-बकऱ्या भरतात आणि गायब होतात. पोलिसांना याचा पत्ताही लागत नाही, हे विशेष! गरिबाच्या कष्टाच्या घामातून जमा केलेले ४१ हजार रुपये एका रात्रीत लंपास होतात, तेव्हा प्रशासनाची ‘संवेदनशीलता’ कुठे जाते, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.
मलकापुरात पल्सरची ‘धूम’: शहरात सुरक्षितता की चोरांची मक्तेदारी?
दुसरीकडे, मलकापूर शहरातही चोरांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही. लक्ष्मी नगर भागातून विजय शांताराम काळे यांची ५० हजार रुपये किमतीची ‘पल्सर १२५’ (एमएच-५ ६-डी-३६३३) चोरांनी घरसमोरून पळवली. रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसहा या वेळेत ही चोरी झाली. शहराच्या मध्यवस्तीतून दुचाकी चोरीला जाते, याचा अर्थ चोरांना कायद्याचा किंवा पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. दुचाकीचा इंजिन नंबर आणि चेसीस नंबर कागदावर नोंदवण्यासाठी पोलीस तत्पर आहेत, पण ती गाडी शोधण्यासाठी आणि अशा घटना रोखण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत?
‘चोरटे आले, चोरटे पाहीले आणि चोरटे जिंकले!’
सध्याची परिस्थिती पाहता असे वाटते की, जिल्ह्यात चोरांसाठी ‘रेड कार्पेट’ टाकले गेले आहे. चोरांना माहित आहे की, चोरी केल्यानंतर फक्त ‘अज्ञात’ म्हणून गुन्हा नोंदवला जाईल आणि तपास अधिकारी बदलत राहतील. या तपासातून काय निष्पन्न होईल, हे येणारा काळच सांगेल. पण तोपर्यंत सामान्यांनी आपल्या बकरीच्या गळ्यात आणि दुचाकीच्या चाकाला स्वतःच साखळदंड बांधून रात्रभर जागून पहारा द्यावा, हीच अपेक्षा प्रशासनाकडून दिसत आहे.
प्रशासनाला झोप कधी लागणार?
बीएनएस कायद्याचे कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हे तर दाखल होत आहेत, पण गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार की नाही? केवळ गुन्हे दाखल करणे म्हणजे कर्तव्यपूर्ती नव्हे. चोरांच्या या वाढत्या हिंमतीमुळे जनतेत संतापाची लाट आहे. जर पोलीस रात्रीची गस्त प्रामाणिकपणे घालत असतील, तर मग या चोऱ्या होतातच कशा? की चोरांना पोलिसांच्या गस्तीच्या वेळा तोंडपाठ झाल्या आहेत? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, या चोरांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जनतेलाच आता ‘स्वसंरक्षणार्थ’ रस्त्यावर उतरावे लागेल, हे नक्की!