https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

लग्नाचे आमिष दाखवून सहा वर्षे अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप

खामगाव, (प्रतिनिधी): तालुक्यातील गारडगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून आणि स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन एका २४ वर्षीय तरुणीवर गेल्या सहा वर्षांपासून सतत अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार भाग्यश्री लक्ष्मण शेगोकार (वय २४ वर्षे) रा. गारडगाव ही उच्चशिक्षित (बी.ए. पदवीधर) असून घरकाम करते. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याच गावातील रहिवासी आरोपी भिमराव रुपाजी इंगळे याने जानेवारी २०२० पासून पीडितेशी जवळीक साधली होती. आरोपीने पीडितेचे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते.

हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पीडितेला मानसिक त्रास देत होता. “जर तू माझे ऐकले नाहीस, तर मी स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घेईन,” अशी भीती घालून आरोपीने जानेवारी २०२० ते ३ एप्रिल २०२६ या प्रदीर्घ कालावधीत पीडितेचे लैंगिक शोषण केले. आरोपीने पीडितेला वारंवार शेगाव येथील विविध लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

लग्नात टाकला खोडा

पीडितेचे लग्न ठरल्यानंतरही आरोपीचा छळ थांबला नाही. पीडितेचे लग्न ज्या तरुणाशी ठरले होते, त्याच्या मावस भावाला आरोपी भिमराव इंगळे याने शेगाव येथे बोलावून घेतले. “या मुलीसोबत लग्न करू नका, तिचे जीवन धोक्यात राहील,” असे म्हणून त्याने लग्नात अडथळा निर्माण केला. इतकेच नव्हे तर, पीडितेसोबत असलेले फोटो त्यांना दाखवून तिची बदनामी केली. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्यामुळे अखेर पीडितेने पोलीस स्टेशन गाठून आपबिती कथन केली.

पोलीस कारवाई आणि तपास

पीडितेच्या तोंडी रिपोर्टवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी भिमराव रुपाजी इंगळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ (२) (एम), ३५१ (२) आणि ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक किशोर तावडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम ह्या करत आहेत.

तालुक्यात संतापाची लाट

एका उच्चशिक्षित तरुणीला अशा प्रकारे धमकावून सहा वर्षे तिचा गैरफायदा घेतल्याच्या घटनेने खामगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!