https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

हृदयद्रावक! दीड महिना उलटला तरी पोटचा गोळा घरी परतला नाही; हतबल पित्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ‘न्याय द्या, अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही’

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): “माझी मुलगी शिकून मोठी होईल, घराचं नाव उज्ज्वल करेल,” हे स्वप्न पाहणाऱ्या एका कष्टकरी बापाच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. अवघ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण होऊन दीड महिना उलटला, तरी अद्याप तिचा शोध लागलेला नाही. धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडोळ येथील एका हतबल पित्याने आता थेट मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे न्यायाची साद घातली आहे.

चांडोळ येथील रहिवासी आणि ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून काम करणारे दिलीप बाबुराव दांडगे यांची १७ वर्षीय मुलगी ४ मार्च २०२६ रोजी घरातून बेपत्ता झाली. तक्रारीनुसार, गावातीलच लखन फुलसिंग मेहेर (राजपूत) या तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये रीतसर एफआयआर दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलीस तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत मुलीच्या पित्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.

दिलीप दांडगे यांनी दिलेल्या निवेदनात आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “माझी मुलगी विज्ञान शाखेत १२ वीत शिकत होती. ४ मार्चला मी कामावर असताना आरोपीने तिला दुचाकीवर बसवून नेल्याचे मला समजले. दीड महिना झाला, पण पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. माझ्या मुलीच्या जिवाला धोका असू शकतो, तिचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लखन मेहेर हा आपल्या मित्राच्या (गणेश द्यावने) मोटारसायकलवरून (एमएच-२८-सीए-६१६६) मुलीला घेऊन पसार झाला आहे. तो सध्या तेलंगणा, कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये लपून बसल्याची शक्यता निवेदनात वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

गुन्हा दाखल होऊन इतके दिवस उलटल्यानंतरही आरोपीचा शोध का लागत नाही? असा संतप्त सवाल पीडित कुटुंबाने उपस्थित केला आहे. आरोपीच्या मित्रांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी केल्यास मुलीचा शोध लागू शकतो, मात्र कारवाई संथ गतीने होत असल्याचा आरोप पित्याने केला आहे.

आमरण उपोषणाचा इशारा

केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही हे निवेदन पाठवण्यात आले आहे. “जर माझ्या मुलीचा तातडीने शोध लागला नाही, तर मला आत्मदहन किंवा उपोषणासारखा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहील,” असा इशारा या हतबल पित्याने दिला आहे.

‘बेटी बचाओ’ नावालाच

एकीकडे शासन ‘बेटी बचाओ’चा नारा देत असताना, दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीला शोधण्यासाठी तिच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांच्या दारात जावे लागत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आता पोलीस प्रशासन या हतबल पित्याला न्याय देऊन त्यांची लेक त्यांच्या पदरात कधी टाकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!