अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर शहराने आजवर अनेक राजकीय आणि सामाजिक स्थित्यंतरे पाहिली. मात्र, याच शहराच्या उदरात सट्टा, मटका, गुटखा आणि काळ्या पैशांचे जे विषारी जाळे विणले गेले आहे, त्याचा स्फोट आता थेट नाशिकच्या भरचौकात झाला आहे. एका नामांकित ‘सट्टाकिंग’च्या पुतण्याला नाशिकमध्ये मिळालेला ‘प्रसाद’ हा केवळ वैयक्तिक वादाचा भाग नसून, तो मलकापूरच्या या छुप्या साम्राज्यातील सडक्या व्यवस्थेचा पर्दाफाश करणारा ठरला आहे.
शहरात ज्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते, ज्यांच्या कापडाच्या दुकानातील घड्यांकडे पाहून सामान्यांना त्यांच्या श्रीमंतीचा हेवा वाटतो, त्याच ‘व्यापारी’ मुखवट्याआड सट्टामटक्याचे काळे साम्राज्य दडलेले आहे, ही आता लपून राहिलेली गोष्ट नाही. अनेक वर्षांपासून कपडा व्यवसायाचा केवळ ‘आडोसा’ वापरून सट्टा, मटका आणि गुटखा पुरवठ्याचे जाळे विणणाऱ्या या कुटुंबाचा इतिहास पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब केवळ नावाला व्यापारी असून, त्यांच्या तिजोरीत येणारा पैसा हा सामान्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसारातून आणि सट्ट्याच्या आकड्यांतून येतो. विमल गुटखा नेटवर्कपासून सुरू झालेला हा प्रवास आज राजकारण आणि समाजकारणाच्या दारापर्यंत पोहोचला आहे, ही शहरासाठी मोठी शोकांतिका आहे.
नाशिकचा ‘परफेक्ट आकडा’ अन् पुतण्याची झाली ‘टाईट खडी’!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि ‘मार्मिक’ वळण म्हणजे नाशिकमध्ये घडलेली घटना. या तथाकथित किंगने आपल्या पुतण्याला मोठ्या विश्वासाने एक ‘परफेक्ट आकडा’ देऊन नाशिकच्या मैदानात उतरवले होते. सट्ट्याच्या बाजारात ‘शब्दाला किंमत’ असते असे म्हटले जाते, मात्र इथे ‘शब्दा’पेक्षा ‘संशया’ने बाजी मारली. नाशिकमधील सट्टा माफियांना या व्यवहाराचा वास लागला आणि भरचौकात पुतण्याची ‘धुलाई’ करण्यात आली. ज्या पुतण्याला मलकापुरात कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करत नव्हते, त्याला नाशिकच्या रस्त्यावर सट्ट्याच्या एका आकड्यासाठी लोळवण्यात आले. विशेष म्हणजे, मारहाण करणाऱ्यांनी केवळ हात साफ केले नाहीत, तर हा ‘आकडा’ मलकापूरच्या कोणत्या ‘तिजोरी’तून आला होता, याची कबुलीही कॅमेऱ्यासमोर घेतल्याची चर्चा आहे. यामुळे आता या किंगचे मुखवटे गळून पडले आहेत.
धार्मिकतेचा बुरखा आणि भोंदूगिरीचा सहारा
या साम्राज्याचे धागेदोरे केवळ गुन्हेगारीपुरते मर्यादित नाहीत. नाशिकमधील एका ‘भोंदू बाबा’च्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण करणे आणि धार्मिक कार्याचे आवरण घालून काळा पैसा पांढरा करण्याचा हा खेळ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. सामान्यांना देवधर्माच्या नावाखाली भुलवायचे आणि पडद्यामागे सट्ट्याचे आकडे फिरवायचे, हा या ‘संतुष्ट हस्ती’चा जुनाच धंदा असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. जेव्हा अधर्माचा गाडा धर्माच्या चाकावर चालू लागतो, तेव्हा त्याचा शेवट नाशिकच्या चौकासारखाच होतो, अशी खोचक टोले आता मलकापुरातील जाणकार नागरिक लगावत आहेत.
पोलिस प्रशासनाची ‘वाकलेली’ मान की ‘मिळमिळीत’ भूमिका?
या सर्व प्रकरणात सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ते म्हणजे स्थानिक पोलिस प्रशासन. तत्कालीन एका पोलीस निरीक्षकाने या गुटखा सम्राटाच्या मुसक्या आवळल्या होत्या, तेव्हा काही काळ हे साम्राज्य थंडावले होते. मात्र, पुन्हा एकदा हे ‘किंग’ सक्रिय कसे झाले? शहराच्या नाकाखाली सट्ट्याचे आकडे फिरतात, तेव्हा खाकी वर्दीला याचा सुगावा का लागत नाही?, राजकीय वरदहस्तामुळे तपास यंत्रणांचे हात बांधले गेले आहेत का?, की पैशांच्या जोरावर कायद्याचा गळा घोटण्याची परंपरा याही वेळी पाळली जाणार?, हे पोलिसांनाच ठाऊक.
सत्य बाहेर येईल का?
आज मलकापुरातील गल्लीबोळांत, नाक्यानाक्यांवर एकच चर्चा आहे, ती म्हणजे नाशिकच्या या राड्यामुळे या ‘संतुष्ट हस्ती’चे साम्राज्य कोसळणार की पुन्हा एकदा ‘सेटलमेंट’चे वारे वाहणार? ज्यांनी गुटख्याच्या माध्यमातून तरुणाईचे आयुष्य बरबाद केले आणि सट्ट्याच्या माध्यमातून गरिबांची घरे लुटली, त्यांना कायद्याचा लगाम बसणार की नाही?, नाशिकमध्ये पुतण्याला बसलेला फटका हा मलकापूरच्या या अंडरवर्ल्डसाठी केवळ ‘ट्रेलर’ आहे. जर सखोल तपास झाला, तर या किंगचे राजकीय लागेबांधे, बेनामी संपत्ती आणि विदर्भातील सट्ट्याचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकते, एवढे मात्र खरे!
पुढील काही दिवसांत मलकापूरमध्ये अनेक ‘धक्के’ बसण्याची चिन्हे आहेत. तूर्तास, नाशिकमधील त्या मारहाणीचा “हिंदवार्ता” हाती लागलेला व्हिडिओ आणि सट्ट्याचा तो ‘परफेक्ट आकडा’ मलकापूरच्या या तथाकथित सन्माननीय कुटुंबाची झोप उडवण्यासाठी पुरेसा ठरला आहे!