रक्ताचे नाते रक्ताला चटावले; जिल्ह्यात गुन्हेगारीचा थरार!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गुन्हेगारीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. कुठे जमिनीच्या वादातून कुर्‍हाडीचे घाव घातले गेले, तर कुठे सुखी संसाराला हुंड्याची दृष्ट लागली. धक्कादायक म्हणजे, याच काळात एका तरुण मुलीने आणि एका शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवल्याने जिल्हा सुन्न झाला आहे.

‘गुरे’ ठरली निमित्त, पण वाद होता जुनाच! दहिवडीत रक्तरंजित थरार

नांदुरा:शेतात गुरे शिरल्याच्या क्षुल्लक कारणावरून दहिवडीत सख्खे नातेवाईक एकमेकांच्या जीवावर उठले. मुकुंदा ढोले यांनी आरोपींना गुरे बाहेर काढण्यास सांगताच, गणेश ढोले याने रागाच्या भरात **हातात कुर्‍हाड घेऊन थेट मुकुंदाच्या डोक्यावर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आईलाही आरोपींनी अमानुष मारहाण केली. आरोपी महिलेने तर क्रूरतेची सीमा ओलांडत फिर्यादीच्या आईचा चावा घेतला. नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल केले आहेत.

‘भरोसा’ तुटला! पैशांच्या हव्यासापोटी विवाहितांचा छळ

मेहकर/संग्रामपूर: समाजातील हुंडाबळीची कीड अजूनही कायम असल्याचे दोन घटनांवरून स्पष्ट झाले. हिवरखेड येथे माहेरून पैसे आणण्यासाठी अर्शिया खातून या विवाहितेचा पती आणि सासरच्या ५ जणांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला. अखेर ‘भरोसा सेल’च्या हस्तक्षेपानंतर हिवरखेड पोलिसांनी पती शेख सलीमसह इतरांवर गुन्हा ठोकला आहे. तर सोनाळा येथे ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी शुभांगी बाटकर यांना सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करत घराबाहेर काढले. दोन चिमुकल्यांसह ही मायमाऊली आता न्यायासाठी पोलीस उंबरठा झिजवत आहे.

ढोर बाजारात चोरट्यांचा ‘हातसाफ!

खामगाव: खामगावचा प्रसिद्ध बैल बाजार (ढोर बाजार) चोरट्यांच्या टप्प्यात आला आहे. शेगावातील शेतकरी हरिदास सहस्त्रबुद्धे हे बैल खरेदीसाठी आले असता, अवघ्या ३० मिनिटांत त्यांची एकएफ डिलक्स बाईक अज्ञात चोरट्याने लंपास केली. भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे बाजार समितीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काळाचा घाला: दोन कुटुंबांचा आधार हरपला

नांदुरा: भिमनगर येथील १७ वर्षीय पायल तिडके हिने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ऐन उमेदीच्या वयात पायलने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर काळेगाव येथे शेतातील विवंचनेतून की अन्य कारणातून? अरविंद इंगळे या ४५ वर्षीय व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या दोन्ही मृत्यूंमागचे गूढ उकलण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. जिल्ह्यातील वाढत्या घटना पाहता, किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या गुन्ह्यांत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!