अजय टप
बुलढाणा,(प्रतिनिधी): पवित्र देवस्थान असलेल्या सैलानी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १५ वर्षे ४ महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात नराधमाने कशाचे तरी आमिष दाखवून, फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी रायपुर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंतरवाडी टेंभी (ता.घनसावंगी जि. जालना) येथील रहिवासी असलेले शंकर (वय ४० वर्षे) नामक फिर्यादी सध्या आपल्या कुटुंबासह बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे वास्तव्यास आहेत. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांची १५ वर्षे ४ महिने वयाची मुलगी ही घरातून अचानक बेपत्ता झाली.
घटनेच्या दिवशी अज्ञात इसमाने तिला काहीतरी आमिष दाखवले आणि तिला फुस लावून पळवून नेले. पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र तिचा कोठेही पत्ता लागला नाही. याप्रकरणी पीडितेच्या पित्याने रायपुर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीशकुमार पाटील हे करीत आहेत.
मुली सुरक्षित कधी होणार?
सैलानी सारख्या गजबजलेल्या भागात अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचे अपहरण होणे, हे समाजाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करते. नराधमांची हिम्मत इतकी वाढली आहे की, ते भरवस्तीतून मुलींना आमिष दाखवून पळवून नेण्याचे धाडस करत आहेत. माझी मुलगी अद्याप सापडलेली नाही, तिला कोणीतरी पळवून नेले आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे आणि आमची मुलगी सुखरूप परत हवी आहे, अशी आर्त हाक पीडितेच्या पित्याने दिली आहे.
आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
घटनेला तीन दिवस उलटून गेल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठले, ज्यामुळे तपासात थोडा विलंब झाला असला, तरी पोलीस आता सर्व बाजूने तपास करत आहेत. आरोपीने नेमके काय आमिष दाखवले? तो स्थानिक आहे की बाहेरचा? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतात का? या सर्व प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित मुलीबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास, त्वरित रायपुर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
