अजय टप
बुलढाणा,(प्रतिनिधी): जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि खळबळजनक लूट केली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ या नवीन प्रकारच्या सायबर दहशतीचा वापर करून शेगाव येथील एका प्रतिष्ठित नागरिकाला तब्बल २५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सायबर सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शेगाव येथील आदर्श नगर भागातील रहिवासी श्री. हेमंत कुमार अनंत राम शुक्ला यांना १५ एप्रिल ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले. गुन्हेगारांनी ९१२५९२६५५१ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ९१२७३५६६८०, ७४२९४९९८०२ वरून फिर्यादीशी संपर्क साधला. सायबर भामट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने फिर्यादीला भीती घातली. “तुमचा मोबाईल क्रमांक दहशतवादी कारवायांमध्ये वापरला गेला आहे,” असा बनाव रचून त्यांना मानसिक विळख्यात घेतले. इतकेच नव्हे तर, तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंग आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये वापरले गेल्याचे सांगत, तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले आहे, अशी बतावणी केली. सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी फिर्यादीला तासनतास व्हिडिओ कॉलवर अडकवून ठेवले आणि अटकेची भीती दाखवून वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. फिर्यादीने घाबरून तब्बल २५ लाख रुपये या गुन्हेगारांच्या खात्यात वळते केले.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हेमंत कुमार शुक्ला यांनी तात्काळ बुलढाणा सायबर पोलीस स्टेशन गाठले. ३ मे २०२६ रोजी याप्रकरणी भारतीय न्याय संहिताच्या कलम २०४, २०५, ३१८(२), ३१८(४), ३१९(२) आणि आयटी ॲक्टच्या ६६(C), ६६(D) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील हे करत आहेत.
सावधान! सायबर पोलिसांचे आवाहन
या प्रकरणाच्या निमित्ताने सायबर पोलिसांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार कायद्यात नाही. कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अटक करू शकत नाही. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या धमक्यांना घाबरू नका. तुमची बँक खाती किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका. पैसे भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. आम्ही तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहोत. नागरिकांनी अशा फोन कॉल्सला बळी पडू नये. अशा प्रकारची मागणी झाल्यास तात्काळ १९३० या हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
