चिखली तालुक्यात ‘रोमिओ’चा धुमाकूळ! अल्पवयीन मुलीची छेड काढून दिली जीवे मारण्याची धमकी;सावंगी गवळी येथील संतापजनक प्रकार; अमडापूर पोलिसांत गुन्हा दाखल

अजय टप
चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, चिखली तालुक्यातील सावंगी गवळी येथे एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करून, तिला लग्नासाठी जबरदस्ती करत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका माथेफिरू ‘रोमिओ’विरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, अशा विकृत मानसिकतेच्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
सावंगी गवळी येथील १६ वर्षीय पीडित मुलगी शिक्षण घेत आहे. आरोपी भूषण मोतीराम शेजोळ (रा. सावंगी गवळी) हा गेल्या काही दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर डोळा ठेवून होता. पीडिता जेव्हा जेव्हा शाळेत जात असे, तेव्हा आरोपी तिचा पाठलाग करायचा. मला तू आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्हणून तो तिला वारंवार त्रास देत असे. पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र आरोपीची हिंमत दिवसेंदिवस वाढतच गेली. ३ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास, पीडिता आपल्या घरासमोर उभी असताना आरोपी भूषण शेजोळ तेथे आला. त्याने पुन्हा एकदा लग्नाचा तगादा लावला. पीडितेने विरोध केला असता, आरोपीने भररस्त्यात तिला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, जर तू लग्नाला नाही म्हणालीस, तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकेन, अशी उघड धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे पीडिता आणि तिचे कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली आले.
या प्रकरणी पीडितेने अमडापूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ७५ (१), ७८(१), ३५१(२), ३५२, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार वंदना बोर्डे ह्या करत आहेत.
‘रोमिओ’ची गय केली जाणार नाही!
समाजात वावरताना मुलींनी निर्भयपणे राहावे, यासाठी शासन प्रयत्नशील असतानाच भूषण शेजोळ सारखे विकृत तरुण कायद्याची भीती विसरल्याचे चित्र आहे. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला लग्नासाठी धमकावणे हा गंभीर गुन्हा असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्याच्या शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!