धाड येथील भीषण अपघात: काळाचा घाला की बेदरकारपणा? कार आणि ट्रॅक्टरच्या धडकेत तीन तुकडे!

अभिनय बोर्डे

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): रस्त्यावरील वेगाची नशा आणि नियमांचे उल्लंघन हे किती भयावह असू शकते, याचा प्रत्यय काल ४ मे २०२६ च्या सायंकाळी धाड येथील वळण मार्गावर आला. एक स्विफ्ट डिझायर कार आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात लोखंडी शरीराचा ट्रॅक्टर चक्क तीन तुकड्यांत विभागला गेला! या अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी सायंकाळी जेव्हा धाड येथील वळण मार्गावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती, तेव्हा ही भीषण दुर्घटना घडली. समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार आणि ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की, ट्रॅक्टरचे इंजिन आणि मागील भाग एकमेकांपासून वेगळे होऊन रस्त्यावर विखुरले गेले. कारचा पुढचा भाग अक्षरशः चुरा झाला असून लोखंडाचा गोळा बनला आहे. या भीषण अपघातात कार चालक आशिष तायडे (रा.करडी) हा जखमी झाला असून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. नशिबाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅक्टर आणि कारची अवस्था पाहून हा मृत्यूचा सापळाच होता असे वाटते.

पोलिसांची कारवाई आणि संथ प्रक्रिया

घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा केली आहेत. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे इतका भीषण अपघात होऊनही रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

आज एका ट्रॅक्टरचे तीन तुकडे झाले आहेत, उद्या कोणाचा जीव जाईल हे सांगता येत नाही. आशिष तायडे हा जखमी झाला असला तरी, जर या धडकेत एखादा पादचारी किंवा दुचाकीस्वार असता तर त्याचे काय झाले असते? हा अपघात केवळ एक ‘दुर्घटना’ नसून ती एक गंभीर चेतावणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!