अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे मलकापूर शहर सध्या एका वेगळ्याच ‘पराक्रमा’मुळे चर्चेत आले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस दलात आता अंतर्गत ‘टोळीयुद्ध’ की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, शहर पोलीस ठाण्यातील शिस्तीचा पार बोजवारा उडाला आहे. पोलीस निरीक्षकांच्या अनुपस्थितीत एका कर्मचाऱ्याने चक्क प्रभारी निरीक्षकांनाच “तुझ्या बापाने मला नोकरी दिली काय?”, अशा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विचारणा केल्याची खमंग चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. या घटनेने खाकी वर्दीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असून, “रक्षकच जर असे भक्षक भाषेचे वापरकर्ते असतील, तर सामान्यांचे काय?”, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
मलकापूर पोलिसांत सुरू असलेल्या चर्चेनुसार, मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक सध्या वैयक्तिक कारणास्तव रजेवर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे या ठाण्याचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. कायद्याने आणि नियमाने ‘चार्ज’ असलेल्या अधिकाऱ्याचा शब्द हा आदेश मानला जातो. मात्र, मलकापूर शहर पोलीस ठाण्यात काही कर्मचाऱ्यांना जणू कोणाचेच भय उरलेले नाही, असे चित्र दिसते आहे. प्रभारी अधिकारी आले काय आणि गेले काय, आम्हाला फरक पडत नाही, अशा अविर्भावात वागणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पारा इतका चढला की त्याने चक्क वरिष्ठांच्या पदाचा आणि वयाचाही विसर पाडला.
पोलीस दलात ‘शिस्त’ हा कणा मानला जातो. मात्र, या कथित घटनेत त्या कण्यालाच सुरुंग लावण्याचे काम एका महाभागाने केले आहे. बाचाबाची दरम्यान “तुझ्या बापाने मला नोकरी दिली काय?”, हे शब्द उच्चारताना संबंधित कर्मचाऱ्याला आपण एका जबाबदार पदावर आहोत, याचे भान राहिले नसावे. विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्याला हे बोलले गेले, ते संपूर्ण ग्रामीण भागाची धुरा सांभाळणारे जबाबदार पद आहे. अशा पद्धतीने जाहीररीत्या अपमान करणे, हे केवळ त्या अधिकाऱ्याचे अपमान नसून संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या तोंडाला काळिमा फासण्याचा प्रकार आहे.
पोलीस ठाणे की ‘पंचायत’?
सध्या पोलीस ठाण्याचे रूपांतर जणू काही स्थानिक पंचायतीत किंवा वादाच्या अड्ड्यात झाले आहे की काय, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. वरिष्ठ सुटीवर गेले की खालचे कर्मचारी ‘मोकाट’ होतात, हा संदेश यातून जात आहे. जर पोलीस दलातील कर्मचारी स्वतःच्या वरिष्ठांचा मान राखू शकत नसतील, तर ते सर्वसामान्य नागरिकांशी किती सौजन्याने वागत असतील, याची प्रचिती यावरून येते. “खंबीर” होण्याऐवजी “उद्धट” होण्याकडे या कर्मचाऱ्याचा कल का वाढला? याला कोणाचे अभय आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
जिल्हा अधीक्षकांकडे डोळे: आता ‘सळई’ फिरणार का?
मलकापूरच्या या प्रकरणाची चर्चा आता जिल्ह्याच्या मुख्यालयापर्यंत पोहोचली आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्ह्यात शिस्त लावण्याचा विडा उचललेला असताना, त्यांच्याच नाकाखाली मलकापुरात असा अनागोंदी कारभार सुरू आहे. केवळ चर्चा म्हणून याकडे दुर्लक्ष केल्यास, भविष्यात खालचे कर्मचारी वरिष्ठांना जुमानणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.
‘स्वच्छता’ मोहिमेची गरज!
मलकापूरच्या सुज्ञ नागरिकांनी आता या प्रकाराबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही पोलिसांकडे न्यायासाठी जातो, पण जर पोलीसच आपापसात अशा घाणेरड्या भाषेत भांडत असतील, तर आम्ही कोणाकडे पाहायचे?, असा सवाल एका ज्येष्ठ नागरिकाने उपस्थित केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, त्या ‘मुजोर’ कर्मचाऱ्याची गचांडी धरून त्याला शिस्तीचे धडे द्यावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे. थोडक्यात काय तर…मलकापूर पोलीस दलातील ही ‘वाचाळवीर’ संस्कृती जर वेळीच ठेचली नाही, तर विदर्भाच्या या प्रवेशद्वारातून शिस्त कायमची ‘एक्झिट’ घेईल, यात शंका नाही. आता चेंडू जिल्हा प्रशासनाच्या कोर्टात आहे; ते या कर्मचाऱ्याचा ‘माज’ उतरवतात की या प्रकरणावर ‘पांघरूण’ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
