बुलढाणा क्राईम रिपोर्ट: जिल्हाभरात गुन्हेगारीचे सत्र; मारहाण, चोरी आणि धमक्यांच्या घटनांनी हादरला बुलढाणा

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या काही दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक वाद, शेतीचे जुने हेवेदावे, सार्वजनिक रस्त्यावरील वाद आणि बस स्थानकावरील चोरी अशा विविध घटनांनी जिल्हा हादरला आहे. खामगाव, धाड, धामणगाव बढे आणि मलकापूर परिसरात पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

खामगाव: बस स्थानकावर वृद्धाचे एक लाखाचे दागिने लंपास

खामगाव शहर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी भगवान देवराव डुबल (वय ८२ वर्षे) रा. शिवाजी नगर हे आपल्या पत्नीसह मुलीकडे चिखली येथे जाण्यासाठी बस स्थानकावर आले होते. अकोला-पुणे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील पाकीट चोरले. या पाकिटात १३ ग्रॅमची सोन्याची चैन, ६ ग्रॅमची अंगठी आणि इतर दागिने, असा एकूण १ लाख रुपयांचा २५ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल होता. पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहिरकर यांनी घटनास्थळाला भेट दिली असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.

खामगाव: सख्ख्या भावाकडून चाकूचा धाक; शेतीच्या पैशावरून वाद

खामगाव ग्रामीण पोलीस हद्दीतील पिंप्रीदेशमुख येथे सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा संघर्ष पाहायला मिळाला. प्रफुल्ल वसतकार यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना त्यांचा भाऊ राहुल वसतकार याने हातात लोखंडी चाकू घेऊन तिथे प्रवेश केला. आईच्या वाट्याचे पैसे आताच दे, असे म्हणत त्याने प्रफुल्ल यांना शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर बांधकाम करणाऱ्या ठेकेदारालाही काम बंद कर, नाहीतर तुझा गळा कापून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी शस्त्र अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हिवरखेड: मुलीला बोलल्याच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत घारोड येथे एका तरुणाला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. सोपान दुतोंडे याने मुलीला काहीतरी वाईट बोलल्याचा संशय घेऊन आरोपी ईश्वर इंगोले, अमोल इंगोले, वैभव इंगोले आणि चंद्रमनी तायडे यांनी त्याला रस्त्यात अडवून पाठीवर, पोटावर आणि तोंडावर गंभीर मारहाण केली. या घटनेत पोलिसांनी ‘ई-साक्ष’ नोंदवून घेतली असून तपास सुरू आहे.

धामणगाव बढे: वृद्धाला काठीने मारून डोके फोडले

गोतमारा (ता. मोताळा) येथे नातेवाईकांमधील वाद टोकाला गेला. संदीप चव्हाण यांचे वडील ताराचंद चव्हाण यांना त्यांचे काका शिवदास चव्हाण आणि इतर तीन नातेवाईकांनी तुझी मुले नोकरीला आहेत म्हणून तू जास्त हवेत उडतो का?, असे म्हणून वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी शिवदास चव्हाण याने ताराचंद यांच्या डोक्यात लाकडी काठी मारून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी वडिलांवर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत.

मलकापूर: अपंग रिक्षाचालकावर हल्ला

मानवतेला काळिमा फासणारी घटना मलकापूर ग्रामीण हद्दीतील सिरसोडी येथे घडली. संतोष खापरे हे आपली ई-रिक्षा घेऊन जात असताना रस्त्यात आरोपींचे बैल बांधलेले होते. रिक्षा जाण्यास जागा नसल्याने त्यांनी बैल बाजूला घेण्यास सांगितले. याचा राग येऊन देविदास भोंडेकर आणि विजय भोंडेकर यांनी संतोष यांना मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, संतोष यांचा डावा हात अपंग असल्याचे माहित असतानाही आरोपींनी त्यांच्या खांद्यावर काठीने प्रहार केला. या प्रकरणी ‘अपंग व्यक्ती अधिनियम २०१६’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

खामगाव: चांदमारी घरकुल: सार्वजनिक रस्ता अडवल्यावरून राडा

खामगाव शहरातील चांदमारी घरकुल परिसरात रस्ता अडवल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. पुनम इंगळे ही तरुणी आपल्या मैत्रिणीसह जात असताना आरोपींनी सार्वजनिक रस्त्यावर बिस्तरा आणि बाजा टाकून रस्ता रोखला होता. जाब विचारला असता आरोपींनी त्यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची परस्परविरोधी तक्रार जया प्रकाश सरदार यांनीही दिली असून, त्यांनी गैरअर्जदारांनी शिवीगाळ व लोटपाट केल्याचा आरोप केला आहे.

धाड: मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी

पोलीस स्टेशन धाड अंतर्गत सातगाव येथील शहनाजबी कुरेशी यांना गैरअर्जदार रवी लोखंडे याने जुन्या वादावरून फोनवर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. शहनाजबी यांच्या जावयालाही फोनवरून धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!