रत्नागिरी/सिंधुदुर्ग,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा आणि जागतिक बाजारपेठेत नाव कमावलेला कोकणी काजू सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा बळी ठरत आहे. वाढते तापमान, भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी आणि शासनाचे दुर्लक्ष यांविरोधात आता कोकणातील शेतकरी एकवटला आहे. आपल्या हक्काच्या भरपाईसाठी आणि अस्तित्वाच्या लढाईसाठी येत्या १५ मे रोजी हजारो बागायतदार मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. ‘चलो मुंबई’ या घोषणेने सध्या सोशल मीडिया आणि कोकणच्या वाड्या-वस्त्यांवर रणधुमाळी सुरू झाली आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच कोकणात तापमानाचा पारा चढला आहे. ३८ ते ४० अंश सेल्सिअसच्या वर गेलेल्या तापमानामुळे आंब्याच्या फळांना ‘सनबर्न’चा मोठा फटका बसला आहे. फळे झाडावरून गळून पडत आहेत किंवा काळी पडत आहेत. बागायतदारांच्या मते, गेल्या ५० वर्षांत न पाहिलेला उन्हाचा कडाका यंदा पहायला मिळत आहे. यामुळे हापूसचे उत्पादन ५० टक्क्यांहून अधिक घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोकणात पाऊस भरपूर पडत असला, तरी यंदा भूगर्भातील पाण्याची पातळी वेगाने खाली गेली आहे. एप्रिलच्या मध्यावरच विहिरींनी तळ गाठल्याने कलमे जगवणे कठीण झाले आहे. ठिबक सिंचन असूनही पाणी नसल्यामुळे हजारो झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत. काजूच्या बागांचीही तीच अवस्था आहे. नवीन लागवड केलेली कलमे तर पूर्णतः करपून गेली आहेत.
काय आहेत प्रमुख मागण्या?
कोकण हापूस उत्पादक आणि काजू बागायतदार संघाने पुकारलेल्या या मोर्चाच्या नैसर्गिक आपत्ती जाहीर करून बाधित बागायतदारांना तातडीने हेक्टरी आर्थिक मदत मिळावी. सध्याची पीक विमा योजना जाचक असून ती बागायतदारांच्या फायद्याची नाही, त्यात बदल करावा. पिकांचे नुकसान झाल्याने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे बँकांच्या कर्जाचे हप्ते स्थगित करावेत. विदेशी काजूच्या आयातीमुळे स्थानिक काजू दरात झालेली घसरण थांबवण्यासाठी ठोस धोरण आखणे, या प्रमुख मागण्या आहेत.
सोशल मीडियावर मोहिमेचा वणवा
‘चलो मुंबई’ या हॅशटॅगखाली कोकणातील तरुण बागायतदार आणि शेतकरी संघटनांनी मोठे रान पेटवले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर गावागावातून व्हिडिओ आणि पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत. “आत्ता नाही तर कधीच नाही” आणि “आमचा आंबा वाचवा, कोकण वाचवा”, अशा घोषणांनी सोशल मीडियाचा वॉल भरला आहे. १५ मे रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किंवा मंत्रालयावर धडक देण्यासाठी गाड्यांचे नियोजनही ऑनलाइन पद्धतीने केले जात आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका
कोकणची संपूर्ण अर्थव्यवस्था आंबा आणि काजूवर अवलंबून आहे. केवळ बागायतदारच नाही, तर या क्षेत्राशी संबंधित असलेले हजारो मजूर, वाहतूकदार, पेटी तयार करणारे कारखानदार आणि किरकोळ विक्रेते यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही बातमी आता केवळ शेतकऱ्यांची राहिली नसून ती संपूर्ण कोकणच्या आर्थिक अस्तित्वाची बनली आहे.
