अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि फोनवरून होणाऱ्या ओळखींचे पर्यवसन गंभीर गुन्ह्यांमध्ये होत असल्याचे चित्र समोर येत आहे. अशीच एक खळबळजनक घटना जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर घडली असून, एका २५ वर्षीय मॉडेलवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यातून वर्ग होऊन आलेल्या ‘झिरो एफआयआर’नुसार मलकापूर शहर पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय मनिषा (नाव बदलले आहे), ज्या व्यवसायाने मॉडेलिंग करतात, त्यांची ओळख आरोपी ऋत्विक कडू कांबळे (वय २२ वर्षे) रा. कुंड खुर्द, (ता.मलकापूर जि. बुलढाणा) याच्याशी झाली होती. आरोपी ऋत्विक हा पीडितेच्या आत्याच्या मित्राचा मावसभाऊ असल्याने त्यांच्यात फोनवरून बोलणे सुरू झाले. सुरुवातीला या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, या प्रेमाचा गैरफायदा घेण्याची कुत्सित बुद्धी आरोपीच्या मनात होती. ऋत्विकने पीडितेवर लग्नाचे गारुड घालून तिला आपल्या जाळ्यात ओढले आणि मलकापूर येथील एका ठिकाणी बोलावून घेतले.
आईस्क्रीम पार्लरच्या आडोशाने नराधमाचे कृत्य
२५ मार्च २०२२ रोजी आरोपीने पीडितेला मलकापूर येथील ‘मेदिनी आईस्क्रीम पार्लर’ (शॉप नं. ०७, गोडे कॉम्प्लेक्स, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ) येथे बोलावले. तिथे आरोपीने मी तुझ्याशीच लग्न करणार, असे खोटे आश्वासन देऊन पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हा अत्याचाराचा सिलसिला केवळ एकदाच थांबला नाही. २५ मार्च २०२२ पासून ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत आरोपीने पीडितेला वारंवार लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपी ऋत्विक कांबळे याने आपले रंग बदलले आणि लग्नास स्पष्ट नकार देऊन तिला वाऱ्यावर सोडले. पीडितेने या फसवणुकीनंतर खचून न जाता जळगाव येथील शनीपेठ पोलीस स्टेशन गाठले आणि तिथे आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली. पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (n) आणि ३७६ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा मलकापूर येथे वर्ग
घटनेचे ठिकाण मलकापूर असल्याने, जळगाव पोलिसांनी हा गुन्हा मलकापूर शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सचिन पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि गजानन कौळासे हे करीत आहेत. लग्नाचे आमिष दाखवून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला बळी पडू नका. कोणाशीही मैत्री करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
