बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-बुलढाणा महामार्गावर बुधवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ‘रस्त्यावरचा राजा’ समजल्या जाणाऱ्या एसटी बसने नियत्रंण सुटल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल १५ दुचाकींना अक्षरशः चिरडले. अवकाळी पावसापासून वाचण्यासाठी दुचाकी चालक झाडाखाली आडोशाला उभे असल्याने, शेकडो लोकांच्या डोळ्यादेखत हा भीषण अपघात घडला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकींचा चक्काचूर झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास बुलढाणा आणि परिसरात अचानक हवामानात बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिखलीकडून बुलढाण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर हतनी फाट्याजवळ पावसाचा जोर वाढल्याने अनेक दुचाकीस्वारांनी आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. स्वतःचा बचाव करण्यासाठी हे सर्व प्रवासी जवळच असलेल्या एका मोठ्या झाडाखाली आणि आडोशाला थांबले होते. त्याच वेळी, चिखलीकडून बुलढाण्याच्या दिशेने वेगाने येणारी भुसावळ आगाराची एसटी बस क्रमांक एमएच-२०-बीएल-२९९२ हतनी फाट्याजवळ आली. पावसाने रस्ता निसरडा झाला होता की चालकाचा ताबा सुटला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, ही भरधाव बस अचानक अनियंत्रित झाली. चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण बस थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींच्या रांगेत घुसली.
दुचाकींचा अक्षरशः पालापाचोळा
बसचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकामागोमाग १५ दुचाकींना बसने जोरदार धडक दिली. काही दुचाकी बसच्या चाकाखाली आल्या, तर काही लांबवर फेकल्या गेल्या. अवघ्या काही सेकंदात उभ्या असलेल्या दुचाकींचा लोखंडी गोळा झाला. बस थांबली तेव्हा समोरचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक दुचाकी बसच्या खाली अडकल्या होत्या, तर काही दुचाकींचे भाग रस्त्यावर विखुरले होते.
पावसामुळे वाचले प्रवाशांचे प्राण
या अपघातातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे कोणालाही दुखापत झाली नाही. ज्या दुचाकींचा चक्काचूर झाला, त्यावर काही मिनिटांपूर्वीच प्रवासी बसलेले होते. मात्र, पाऊस सुरू झाल्यामुळे ते सर्वजण झाडाखाली सुरक्षित ठिकाणी थांबले होते. जर पाऊस नसता आणि हे सर्व प्रवासी आपल्या दुचाकीवर असते, तर आज बुलढाणा जिल्ह्यात मोठा शोककळा पसरली असती. देवानेच आम्हाला वाचवले, अशी भावना घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी व्यक्त केली.
प्रवाशांचा संताप आणि गर्दी
अपघात घडताच मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. झाडाखाली थांबलेल्या प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बसच्या दिशेने धाव घेतली. आपल्या डोळ्यादेखत आपल्या कष्टाच्या कमाईने घेतलेल्या गाड्यांचा चक्काचूर झालेला पाहून अनेक तरुण आक्रमक झाले होते. घटनेची माहिती मिळताच हतनी फाटा परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
प्रशासनाची भूमिका आणि तपास
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. भुसावळ आगाराची ही बस नेमकी तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित झाली की चालकाच्या हलगर्जीपणामुळे, याचा तपास आता पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी करत आहेत. बसच्या चाकाखाली अडकलेल्या दुचाकी काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
