बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शेतकरी बांधवांचे शेतातील मोटार पंप चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांनी पर्दाफाश केला आहे. आंधई (ता. चिखली) येथील धरणावरून आणि विहिरीतून चोरलेले दोन मोटार पंप विकण्यासाठी घेऊन जात असताना तीन चोरट्यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चिखली तालुक्यातील आंधई येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी श्री. बळीराम सखाराम बऱ्हाटे (वय ३२ वर्षे) यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ५ जानेवारी २०२६ च्या सायंकाळी ६ वाजेपासून ते ६ जानेवारी २०२६ च्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आंधई शिवारातील धरणावरून त्यांची टोरमॅक्स कंपनीची ७.५ एच.पी. क्षमतेची मोटार (किंमत २० हजार रुपये) चोरून नेली. केवळ बऱ्हाटे यांचीच नव्हे, तर त्यांच्या शेजारील शेतकरी प्रल्हाद मानिकराव मोरे यांच्या विहिरीतूनही ५ एच.पी. क्षमतेचा मोटार पंप (किंमत ५ हजार रुपये) चोरीला गेल्याचे समोर आले. या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
शेतकरी बांधवांच्या साहित्याची चोरी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणाची तातडीने उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार अनंता फरतळे, सुनील मिसाळ, गणेश वाघ हे गुन्हेगारांच्या शोधात असताना, ६ मे २०२६ रोजी आंधई येथील तीन तरुण अतुल सौभागे, उमेश शेळके आणि आदेश चौथे, हे अमडापूर परिसरात चोरीचे मोटार पंप विकण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने अमडापूर टाऊनमधील बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयास्पद रित्या पोत्यामध्ये काहीतरी लपवून घेऊन जात असलेल्या तीन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोत्याची झडती घेतली असता, त्यात दोन इलेक्ट्रिक मोटार पंप आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ७.५ एच.पी. आणि ५ एच.पी. क्षमतेचे दोन मोटार पंप, ज्याची एकूण किंमत ४५ हजार रुपये आहे, असा मुद्देमाल हस्तगत केला. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमडापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
