अजय टप
जळगाव जामोद,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा खुर्द येथे घडली आहे. अवघ्या ७ वर्षे वयाच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमाला जळगाव जामोद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रफुल अनिल सपकाळ असे या नराधम आरोपीचे नाव असून, त्याच्या या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
निंभोरा खुर्द येथील ७ वर्षीय चिमुरडी ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आरोपी प्रफुल सपकाळ याच्या दुकानात ‘पेप्सी’ आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी घरात एकटाच होता. त्याने चिमुरडीच्या अजाणतेपणाचा फायदा घेण्याचे ठरवले. माझ्या हाताला लागले आहे, तू तुझ्या हाताने फ्रिजमधून पेप्सी घे, असे खोटे कारण सांगून त्याने पीडितेेला घराच्या आत बोलावले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने पीडितेशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. सर्वच मुली करतात, मला एक मिनिट करू दे, असे निर्लज्ज विधान करत त्याने पीडितेचे कपडे काढले आणि तिला पलंगावर टाकून तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. अशा भयानक परिस्थितीतही त्या चिमुरडीने तेथून पळ काढला आणि घरी जाऊन पालकांना सर्व हकीकत सांगितली. पीडितेचे वडील तात्काळ आरोपीच्या घरी गेले आणि त्यांनी जाब विचारला असता, नराधम प्रफुल सपकाळ याने पश्चात्ताप व्यक्त करण्याऐवजी, मी काहीच केले नाही, तुला काय करायचे ते कर, अशी उलट धमकी दिली. आरोपीच्या या उद्दामपणामुळे पीडितेच्या वडिलांनी तडक पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.
जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ७५, ३५१(२), पोक्सो कायद्याचे ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास मपोउपनि स्नेहा शेडगे ह्या करत आहेत.
समाजातून संताप व्यक्त
एकीकडे आपण स्त्री सन्मानाच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे अशा विकृत मानसिकतेचे लोक लहान मुलींनाही सोडत नाहीत. निंभोरा खुर्द सारख्या शांत गावात घडलेल्या या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा नराधमाला कठोरत कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही, अशी मागणी जोर धरत आहे.
