शेगाव शहरात भरदिवसा धाडसी चोरी; एसबीआय बँकेसमोर स्कूटीची डिक्की फोडून ३५ हजार लांबवले

अजय टप

शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोरून भरदिवसा एका इसमाच्या स्कूटीची डिक्की फोडून ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील फरशी जामा मशीद परिसरात राहणारे मोहम्मद शरीफ मोहम्मद याकूब (वय ४७ वर्षे) हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. एका प्लॉटच्या व्यवहारापोटी त्यांचे मित्र मोहम्मद इरफान मोहम्मद साहेब यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे ३ लाख रुपये जमा झाले होते. ७ मे २०२६ रोजी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचे मित्र पैसे काढण्यासाठी एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेत आले होते. बँकेतून १ लाख रुपये काढल्यानंतर, मोहम्मद शरीफ यांनी त्यापैकी ३५ हजार रुपये आपल्या ॲक्सेस स्कूटी क्रमांक एमएच-३०-बीएफ-७१६२ डिक्कीत ठेवले आणि उर्वरित ६५ हजार रुपये स्वतःच्या खिशात ठेवले. त्यांचे मित्र उर्वरित २ लाख रुपये काढण्यासाठी बँकेतच थांबले होते, तर मोहम्मद शरीफ हे नमाज पठण करण्यासाठी शिवाजी चौक येथील कच्च्या मशिदीत गेले होते.

डिक्कीचे लॉक तोडून चोरी

नमाज पठण करून दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास जेव्हा फिर्यादी पुन्हा बँकेसमोर आले आणि मित्राने काढलेली रक्कम ठेवण्यासाठी स्कूटीची डिक्की उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. डिक्कीचे लॉक आधीच तुटलेले होते आणि आत ठेवलेले ३५ हजार रुपये गायब होते. आजूबाजूला शोध घेऊनही चोरट्याचा कोणताही सुगावा लागला नाही. याप्रकरणी मोहम्मद शरीफ यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष गवई हे करीत आहेत.

बँकेच्या परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न

शहरातील सर्वात गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या डिक्की फोडून चोरी झाल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!