अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो ): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच असून, विविध पोलीस ठाण्यांतर्गत एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सिंदखेड राजा येथील एक तरुण, मलकापूर व जळगाव जामोद येथील दोन अल्पवयीन मुली आणि लोणार तालुक्यातील एका विवाहित महिलेचा समावेश आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंदखेड राजा: लग्नाला जातो म्हणून घराबाहेर पडलेला तरुण बेपत्ता
सिंदखेड राजा तालुक्यातील खामगाव खापरखुटी येथील किरण राम चव्हाण हा २५ वर्षीय तरुण ७ मे रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ‘लग्नाला जातो’ असे सांगून घरातून निघाला होता. मात्र, उशिरापर्यंत तो परतला नाही आणि त्याचा मोबाईलही बंद येत आहे. नातेवाईकांकडे चौकशी केली असता तो तेथे पोहोचला नसल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पत्नी पुष्पा किरण चव्हाण यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी मिसिंग दाखल केला आहे. त्याचा रंग गोरा, बांधा सडपातळ, उंची ५ फूट ७ इंच असून त्याने अंगात निळा शर्ट आणि काळी नाईट पॅन्ट घातलेली आहे.
मलकापूर शहर: टेलरकडे गेलेली १८ वर्षीय मुलगी बेपत्ता
मलकापूर शहरात बेलाड येथील १८ वर्षीय शुभांगी देविदास सूर्यवंशी ही मुलगी ८ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातील टेलरकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही ती परतली नाही. टेलरकडे विचारपूस केली असता, ती तेथे आलीच नसल्याचे समजले. वडील देविदास महादेव सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. तिचा रंग सावळा, उंची ५ फूट ७ इंच, गोल चेहरा असून तिने अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेला आहे.
जळगाव जामोद: १६ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीकडून अपहरण?
जळगाव जामोद तालुक्यातील खेलपूर शेतशिवारात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी जगदीश जामसिंग डावर आणि त्यांची पत्नी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. आपली १६ वर्षांची मुलगी अनिता हिला त्यांनी भावाच्या घरी सोडले होते. ५ मे रोजी दुपारी १२ ते ७ च्या दरम्यान अनिता घरातून बेपत्ता झाली. बराच शोध घेऊनही ती न मिळाल्याने, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी कलम १३७ (२) BNS नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा रान निमगोरा, उंची ४ फूट ६ इंच, सडपातळ बांधा असून अंगात जीन्स पॅन्ट आणि टॉप घातलेला आहे.
लोणार: ‘साडीला फॉल लावते’ म्हणत निघालेली विवाहिता बेपत्ता
लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील २५ वर्षीय विवाहित महिला सौ. वर्षा ज्ञानेश्वर मापारी या ८ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ‘साडीला फॉल लावून आणते’ असे सांगून घरातून बाहेर पडल्या. सोबत त्यांनी काही साड्या, ३००० रुपये रोख आणि अँड्रॉइड मोबाईल घेतला होता. मात्र, त्या परतल्या नाहीत आणि त्यांचा फोनही बंद येत आहे. पती ज्ञानेश्वर भागवत मापारी यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी कायमी मिसिंग नुसार नोंद केली आहे. सावळा रंग, लांब काळे केस, उंची ५ फूट, अंगावर चॉकलेटी साडी, असे तिचे वर्णन आहे. या सर्व घटनांचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस ठाण्यांचे तपास अधिकारी करत आहेत. वरील वर्णनाचे कोणीही व्यक्ती आढळल्यास किंवा त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळाल्यास, संबंधित पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
