धक्कादायक: पोटच्या मुलीची वडिलांनीच केली हत्या; जळगाव जामोद येथील हत्येच्या गुन्ह्याचा पर्दाफाश

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजूरा शिवारात एका २० ते २५ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शिर नसलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास करत अवघ्या काही दिवसांत उकल केली असून, याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली आहे.
२६ एप्रिल २०२६ रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजूरा शिवारातील आसिफ मुल्लाजी यांच्या शेतात एका तरुणीचा शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणीची हत्या करून तिचे शिर धडापासून वेगळे केले होते आणि प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कलम १०३(१) व २३८ भा.न्या.सं. अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मध्य प्रदेश, अमरावती, अकोला आणि जळगाव खान्देश परिसरात तपास चक्रे फिरवली.
तपासादरम्यान ९ मे रोजी पोलिसांना माहिती मिळाली की, मध्य प्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनमध्ये शिवानी बापुराम कलमेकर नावाची तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल आहे. या माहितीवरून पोलिसांनी तिचे वडील बापूराम नथ्थु कलमेकर (वय ५५ वर्षे) आणि भाऊ अजय बापूराम कलमेकर (वय २७ वर्षे) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणीक लोढा,अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुनील अंबुलकर, सपोनि यशोदा कणसे, पोउपनि पंकज सपकाळे आणि एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
‘ऑनर किलिंग’चा संशय
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतक शिवानीचा विवाह १५ एप्रिल २०२६ रोजी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील प्रकाश भिलावेकर याच्याशी झाला होता. मात्र, शिवानीचे तिच्या एका चुलत भावावर प्रेम होते आणि लग्नानंतरही ती ऐकत नसल्याने रागाच्या भरात वडील बापूराम कलमेकर याने २३ एप्रिलच्या रात्री शिवानीच्या डोक्यात बांबू मारून तिची हत्या केली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह एक दिवस घरातच ठेवला. त्यानंतर वडील आणि भावाने मोटारसायकलवरून मृतदेह राजूरा शिवारात नेला, तिथे तिची ओळख पटू नये म्हणून तिचे शिर कापून वेगळे केले आणि प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला. गुन्हा केल्यानंतर त्यांनीच खकणार पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!