बुलढाणा जिल्हा क्राईम रिपोर्ट: अपघातात दोघांचा मृत्यू, तर मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी जिल्हा हादरला

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):गेल्या २४ ते ४८ तासांत बुलढाणा जिल्ह्यात अपघातांचे सत्र आणि वादावादीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बोराखेडी आणि नांदुरा पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जळगाव जामोद आणि मलकापूर परिसरात झालेल्या रस्ते अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

बोरखेडी: शेतात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तालखेड शिवारात एका ६८ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. समाधान बाबुराव खाकरे, असे मृताचे नाव आहे. ७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास राजेंद्र गायकवाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांचे पुतणे वैभव खाकरे यांच्या रिपोर्टवरून बोराखेडी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दिलीप तडवी हे करत आहेत.

नांदुरा: रस्ते अपघातात एकाचा मृत्यू, तर अनेक जखमी

कोलासर फाट्याजवळ ९ जून रोजी पहाटे एका भीषण अपघातात पंढरी त्र्यंबक बगाडे (वय ५३ वर्षे) यांचा मृत्यू झाला. भरधाव युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीयू-७६०५ ने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात आरोपी चालक आणि त्याच्या मागे बसलेला इसमही जखमी झाले आहेत.

जळगाव जामोद: सुणगाव जवळ बऱ्हाणपूर रोडवर प्रवाशांनी भरलेली मिनी बस क्रमांक एमपी-४६-टी-०९६३ उलटल्याने भीषण अपघात झाला. चालक जोगेंद्र शिवचंद राम हा बस भरधाव वेगाने चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले. या अपघातात फिर्यादी संजय बरडे यांचे ८ नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला.

मलकापूर शहर:कोलते कॉलेजसमोर अज्ञात अपे रिक्षाने एमपी-६८-एल-०६३९ स्कुटीला धडक दिली. यात मयंक झनके हा युवक गंभीर जखमी झाला. खामगाव ग्रामीण: पारखेड फाट्याजवळ बलेनो कारने एमएच-१३-आरएफ-२१०८ मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून वाहनाचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

नांदुरा: पेट्रोल पंपावर तोडफोड आणि १.१५ लाखांचे नुकसान

नांदुरा येथील जीओ पेट्रोल पंपावर मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादात आरोपी धर्मेश तायडे याने पेट्रोल पंपाच्या नोझल आणि पाईप्सची तोडफोड केली. यामुळे पंपाचे अंदाजे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पैसे दिले नाही तर पेट्रोल पंप जाळून टाकीन, अशी धमकीही आरोपीने दिली. पोलिसांनी याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव: जुन्या वादातून प्राणघातक हल्ला

खामगाव येथील बाळापूर फैल भागात जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. शुभम माटकर हे घराबाहेर फोनवर बोलत असताना करण कोल्हे, विशाल कोल्हे आणि संभाजी कोल्हे यांनी त्यांच्यावर लाकडी काठीने हल्ला केला. शुभम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

जानेफळ: काम अडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जानेफळ ते अमडापूर रोडच्या कामावर देखरेख करणारे सुपरवायझर गौतम मोरे यांना आरोपी समाधान खरात याने अडवून शिवीगाळ केली. आरोपीने आपली मोटारसायकल हायवा गाडीच्या टायरखाली लोटून कामात अडथळा निर्माण केला. मला कामावरून का काढले?, या रागातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

मद्यपी चालकांवर बुलढाणा शहर पोलिसांची कारवाई

बुलढाणा शहर पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या दोन जणांवर कारवाई केली. दिपक जोग पेट्रोल पंपासमोर गोंधळ घालणारा रमेश जगताप याला महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ताब्यात घेण्यात आले. त्याच ठिकाणी आपली रिक्षा एमएच-२८-आर-१२ वेडीवाकडी चालवणारा चालक अर्जुन लोखंडे याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!