ढालसावंगी हादरले! किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोन्ही बाजूंच्या १० जणांवर गुन्हे दाखल

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे लग्नसराईची धामधूम सुरू असताना, बुलडाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढालसावंगी गावात किरकोळ कारणावरून दोन गटांत मोठा राडा झाला आहे. एका बाजूला लग्नातील ‘संस्थानच्या भांड्यांचा’ वाद, तर दुसऱ्या बाजूला जुन्या खुनशीतून झालेली शिवीगाळ यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी धाड पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

“माझ्या वडिलांना शिवी का दिली?”, तीन महिन्यांपूर्वीचा राग निघाला बाहेर

पहिली घटना १० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादी वाजीद खान बुढण खान (वय ३२ वर्षे) हे आपल्या घरासमोर उभे असताना गावातीलच रहीम शहा वजीर शहा आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी त्यांना गाठले.

आरोपी रहीम शहा याने तू तीन महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांना शिवीगाळ का केली होती?, असा जाब विचारत वाजीद खान यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाजीद खान यांनी मी कोणालाही शिवी दिली नाही, असे सांगूनही आरोपी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतापलेल्या रहीम शहाने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत वाजीद खान यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान, सलमान शहा, मेहबूब शहा आणि रुबाब शहा या तिघांनी वाजीद खान यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकरणी वाजीद खान यांच्या तक्रारीवरून धाड पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लग्नातील ‘संस्थानची भांडी’ ठरली वादाचे मूळ; ६ जणांवर गुन्हा

पहिली घटना घडत असतानाच, त्याच दिवशी आणि त्याच वेळी दुसरी एक घटना घडली, ज्याचे कारण अतिशय किरकोळ पण धक्कादायक होते. फिर्यादी बशीर शहा चाँद शहा (वय ६० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पुतण्याच्या मुलीचे लग्न होते. लग्नासाठी आणलेली ‘संस्थानची भांडी’ परत नेण्यावरून हा वाद उफाळला.

आरोपी शेख वाजीद, शेख आरिफ आणि शेख मोजम हे भांडी नेण्यासाठी आले होते. फिर्यादीचा पुतण्या मोसीन शहा याने भांडी धुवून देतो, असे म्हटले असता, आरोपींनी भरलेली भांडी नेण्याचा आग्रह धरला. याच वादातून आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला मशिदीजवळ गाठले आणि काट डालेंगे, मार डालेंगे, अशा धमक्या देत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी, त्यांची मुलगी आणि मुलाला लोटपाट करून मारहाण केली.

याप्रकरणी बशीर शहा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शेख वाजीद, शेख आरिफ, शेख मोजम, शेख अजीम, शेख नईम आणि शेख युनूस खान अशा सहा जणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९१(२), १९०, २९६, ११५, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गावात दहशतीचे वातावरण; पोलिसांचा कडा पहारा

एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन गटांत झालेल्या या राड्यामुळे ढालसावंगी गावात भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनांचे धागेदोरे एकमेकांशी गुंफलेले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!