अजय टप
चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): चिखली तालुक्यातील साकेगाव परिसरात शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नुकतीच बोराळा शिवारातील एका शेतातून ३५ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
साकेगाव येथील रहिवासी अविनाश दत्तात्रय तायडे (वय ३२ वर्षे) यांचे बोराळा शिवारात गट क्रमांक ८९ मध्ये ३ एकर शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील बोअरवेलवर शेतीकामासाठी ५ एचपी क्षमतेची ड्युक कंपनीची इलेक्ट्रिक मोटार बसवली होती. दिनांक ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तायडे हे शेतात चक्कर मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी बोअरची मोटार सुरू करून पाहिली असता ती व्यवस्थित सुरू होती. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी जपून वापरण्यासाठी आणि मशागतीच्या कामामुळे त्यांनी पुन्हा ९ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता शेतात जाऊन पाहिले असता, त्यांना धक्काच बसला. बोअरमधील मोटार, केबल आणि पाईप गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बोअरवेलमधून ५ एचपी ड्युक कंपनी मोटार १ नग (किंमत २५ हजार रुपये), एचडीपीई पाईप ३१० फूट (किंमत ६ हजार रुपये), इलेक्ट्रिक वायर (केबल) ३२० फूट (किंमत ४ हजार रुपये), मोटारीला बांधलेली दोरी ३३० फूट (किंमत ५०० रुपये), असे एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.
याप्रकरणी अविनाश तायडे यांनी रायपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दशरथ शितोळे हे करीत आहेत.
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची नितांत गरज असताना, सिंचनासाठी महत्त्वाची असलेली मोटार चोरीला गेल्यामुळे शेतकरी अविनाश तायडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. साकेगाव आणि बोराळा शिवार परिसरात अशा प्रकारे शेती साहित्याची चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी शेतात कुणी नसल्याचा फायदा घेऊन हे चोरटे डल्ला मारत आहेत. रायपूर पोलिसांनी या भागातील गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
