धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): धाड पोलीस स्टेशन हद्दीत सराईतपणे जातीय गुन्हे करून सामाजिक शांतता धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी आता कंबर कसली आहे. वारंवार गुन्हे करूनही वर्तणुकीत सुधारणा न करणाऱ्या आबीद खान अमनउल्ला खान (वय ३२ वर्षे) रा. धाड यास बुलढाणा जिल्ह्यातून दोन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ माजली आहे.
आबीद खान अमनउल्ला खान याच्यावर धाड पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक जातीय गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे धाड गावात आणि परिसरात हिंदू-मुस्लिम जातीय तणाव निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्था बिघडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. सामान्य नागरिकांमध्ये त्याची इतकी दहशत होती की, त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या सूचनेवरून या इसमाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी सर्व पुराव्यांचा आणि जातीय तणावाच्या संवेदनशीलतेचा विचार करून ११ मे २०२६ पासून आबीद खान याला दोन महिन्यांकरिता जिल्हाबदलीचे आदेश दिले आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, पोउनि परमेश्वर केंद्रे आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
