जळगाव जामोदमध्ये १७ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञातावर पळवून नेल्याचा गुन्हा दाखल

अजय टप

जळगाव जामोद,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): स्थानिक ताटीपुरा भागातील काळा मारोती परिसरातील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी संशयास्पद रित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्लरला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली ही मुलगी परत न आल्याने, तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणास्तव पळवून नेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव जामोद येथील रहिवासी असलेले व्यावसायिक यांची १६ वर्षे ९ महिने वयाची मुलगी १० मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घरातून निघाली होती. तिने आपल्या आईला मी पार्लरला जाऊन येते, असे सांगितले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही. ती घरी न परतल्याने कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले. पालकांनी सुरुवातीला तिच्या मैत्रिणींकडे, आजूबाजूच्या परिसरात आणि जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र, तिचा कुठेही पत्ता लागला नाही. दिवसभर शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्याने अखेर वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. ११ मे २०२६ रोजी मुलीच्या पित्याने त्यांच्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संजय वेरुळकर हे करीत आहेत. अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!