बुलडाणा: उऱ्हा येथे रस्ते वादातून महिलेचा विनयभंग आणि कुटुंबाला बेदम मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अजय टप

धामणगाव बढे (हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथे रस्त्याच्या जुन्या वादातून एका महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला व चिमुरड्या मुलाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३१ वर्षीय फिर्यादी रूपाली ह्या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी आणि आरोपी कुवरसिंग चव्हाण यांच्यात घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जुना वाद सुरू आहे. १५ मे २०२६ रोजी सकाळी ९.१० वाजेच्या सुमारास, आरोपी कुवरसिंग चव्हाण आणि संकेत चव्हाण हे फिर्यादीच्या पतीला मारहाण करत होते. पतीला वाचवण्यासाठी फिर्यादी धावून गेल्या असता, आरोपींनी त्यांच्या पतीला नाल्यात ढकलून दिले. याच वेळी आरोपी संकेत कुवरसिंग चव्हाण याने फिर्यादीला जमिनीवर पाडून, अंगावर बसून तिचा हात पकडला आणि ब्लाउज फाडून विनयभंग केला. या झटापटीत फिर्यादीच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे.

मानवतेला काळिमा फासणारी बाब म्हणजे, आरोपींनी फिर्यादीचा अवघ्या ४ वर्षांचा मुलगा कृष्णा यालाही जोरात ढकलून दिले. यामध्ये या लहान बालकाच्या डाव्या हाताला आणि पायाला गंभीर मार लागला आहे. तसेच फिर्यादीच्या पतीच्या डोक्याला, उजव्या हाताला आणि दोन्ही पायांच्या घोट्याला मार लागून ते जखमी झाले आहेत. घटनेदरम्यान तिसरा आरोपी मोनू कुवरसिंग चव्हाण याने फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. “तुम्हाला या रस्त्याने जाऊ देणार नाही, जर पुन्हा या रस्त्याने आलात तर तुम्हा दोघांना जीवे मारून टाकू,” अशी धमकी आरोपींनी दिली.

फिर्यादीच्या घराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर आरोपी कुवरसिंग चव्हाण याने मुद्दाम वाळू ओतून ठेवली आहे, ज्यामुळे फिर्यादीची बैलगाडी किंवा इतर कोणतेही वाहन घरापर्यंत जाऊ शकत नाही. अशा प्रकारे आरोपींनी फिर्यादीचा रस्ता अडवून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला.

याप्रकरणी धामणगाव पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ७४, ११५(२), १२६(१) व १२६(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय जवरे हे करत आहे. गावातील या प्रकारामुळे उऱ्हा परिसरात तणावाचे वातावरण असून, एका अंगणवाडी सेविकेवर आणि तिच्या लहान मुलावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!