मलकापूर बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लंपास!;एसटी बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने साधला डाव

अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): एसटी बसमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या घाईगडबडीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे. मलकापूर बस स्थानकावर बुलडाणा येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या एका महिला प्रवाशाच्या पर्सची चेन चोरट्याने अत्यंत चालाखीने उघडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीत महिलेचे १ लाख २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाले असून, याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी शिल्पा संजय पठठे (वय ३२ वर्षे, व्यवसाय: गृहिणी, राहणार: माता महाकाली नगर, मलकापूर, ह.मु. चांडक ले-आऊट, बुलडाणा) या सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी संध्याकाळच्या सुमारास मलकापूर बस स्थानकावर आल्या होत्या. त्यांना बुलडाणा येथे जाायचे असल्याने त्या बस क्रमांक एमएच-१४-एलएक्स-८३२८ मध्ये चढत होत्या. संध्याकाळची वेळ असल्याने बस स्थानकावर आणि बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होती. याच गर्दीचा आणि गडबडीचा फायदा बस स्थानकावर दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने घेतला. फिर्यादी शिल्पा पठ्ठे या बसमध्ये चढत असताना, चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन अगदी अलगदपणे उघडली. पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन चोरटा गर्दीत पसार झाला. बसमध्ये स्थिरावल्यानंतर किंवा काही वेळाने फिर्यादीच्या लक्षात आले की त्यांच्या पर्सची चेन उघडी असून आतील १ लाख २१ हजार रुपयांचे (एक लाख एकवीस हजार रुपये)** दागिने चोरून नेले. यामध्ये छोटे गंठणची पोत, काळे मणी व सोन्याचे गोल मणी ओवलेली पोत, सोन्याचे कानातले टॉप्सचा समावेश आहे.
मध्यरात्री पोलिसात गुन्हा दाखल
आपली फसवणूक आणि चोरी झाल्याचे लक्षात येताच सौ. शिल्पा पठठे यांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. त्यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलिसांनी मंगळवार, १९ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!