खामगाव ग्रामीण पोलिसांत ५ जणांविरुद्ध हुंडाबळी व छळाचा गुन्हा दाखल; ‘भरोसा सेल’च्या समुपदेशनानंतर अखेर तक्रार

अजय टप

खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करून पैशांची मागणी करणाऱ्या पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा येथील ‘भरोसा सेल’मध्ये दोन्ही बाजूंनी समझोता न झाल्याने अखेर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित महिला शोभा सुरडकर यांचा विवाह मेहकर तालुक्यातील वडाळी येथील नवनीत सुरडकर यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर, आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी आपापसात संगणमत करून पीडितेला विविध कारणांवरून त्रास देण्यास सुरुवात केली. सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात होता, तसेच बेकायदेशीरपणे पैशांची मागणी केली जात होती.

हा त्रास असह्य झाल्याने पीडितेने अखेर आपल्या माहेरी (वहाळा खुर्द, ता. खामगाव) आश्रय घेतला. सासरच्या जाचाला कंटाळून तिने पती, सासरे, नणंदा आणि नंदोई यांच्याविरुद्ध १६ जुलै २०२५ रोजी ‘भरोसा सेल’ बुलढाणा येथे न्याय मिळण्यासाठी कायदेशीर अर्ज दाखल केला होता. या सेलमध्ये शोभा सुरडकर आणि त्यांच्या सासरच्या मंडळींना बोलावून अनेकदा समुपदेशन करण्यात आले. मात्र, सासरच्या मंडळींनी आपल्या वर्तनात सुधारणा न केल्याने आणि समेट घडवून आणण्यास नकार दिल्यामुळे हा वाद मिटू शकला नाही.

अखेर, भरोसा सेल बुलढाणा यांच्या संदर्भातील पत्र (क्र. पोअबु/मबवाअप्रकक्ष/भरोसा सेल/२०२६, दिनांक १३ मे २०२६) नुसार पीडितेची लेखी तक्रार आणि फिर्याद पुढील कायदेशीर कारवाईसाठी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी नवनीत सिताराम सुरडकर (पती), सिताराम सुरडकर (सासरे) दोघेही राहणार: वडाळी, पोस्ट: धोत्रा, ता. मेहकर, जि. बुलढाणा, साधना दिपक गवई (ननद), दिपक मनोहर गवई (नंदोई) दोघेही रा. अंत्रज, ता. खामगाव, जि. बुलढाणा, लता राजेन्द्र वानखडे (ननद), रा. जयरामगड, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ (अ), ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!