मलकापूर नगर परिषदेचा नियोजनशून्य कारभार; ‘प्रहार’चा गाढव मोर्चा काढण्याचा इशारा!

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात मलकापूर नगर परिषद प्रशासन पूर्णतः निष्क्रीय ठरले आहे. ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे. येत्या काही दिवसांत जनतेच्या समस्या सोडवून मूलभूत सुविधा न पुरवल्यास नगर परिषद कार्यालयावर ‘गाढव मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशारा प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी १८ मे रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १५ दिवस वाट पाहावी लागत आहे. परिणामी, जनतेला पदरचे पैसे खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे. दुसरीकडे, शहरात स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपयांचा खर्च दाखवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र कचऱ्याचे ढीग आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिव्यांगांचा निधी प्रलंबित

एकिकडे नागरिक त्रस्त असताना, दुसरीकडे पालिकेचा कंत्राटी सफाई कर्मचारी वर्गही आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे पगार रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, नियमानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. हा निधी त्वरित वितरित करावा, अशी मागणी ‘प्रहार’ने केली आहे.

शासनाच्या नियमांनुसार नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आहे. परंतु, मलकापूर पालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी या नियमाला हरताळ फासत अद्यापही रजिस्टरवरच स्वाक्षरी करत आहेत. अशा दांडगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नक्की कोणाचे अभय आहे? याची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पावसाळा आलेला असताना शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी देखील अजय टप यांनी केली आहे. या न्याय्य मागण्यांवर प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर प्रहार संघटनेच्या वतीने नगर परिषदेवर तीव्र स्वरूपाचे ‘गाढव मोर्चा’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेवटी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!