दुर्दैवी अपघात: सहकार विद्या मंदिरासमोर बोलेरो पिकअप आणि दुचाकीची समोरासमोर धडक; ३९ वर्षीय शिक्षकाचा जागीच मृत्यू

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): धाड-मौंढाळा मार्गावर असलेल्या सहकार विद्या मंदिर परिसरामध्ये आज १९ मे च्या रात्री १०.३० वाजता दरम्यान एका भीषण रस्ते अपघातात ३९ वर्षीय तरुण शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. दुधाचे संकलन करून जाणाऱ्या बोलेरो पिकअप आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला. विष्णू उर्फ विनोद काळे (वय ३९) असे मृत शिक्षकाचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-४८-एजी-२८९५ ही बेलोरा (जि.जालना)
येथून दूध संकलन करून अमर दूध डेअरीच्या दिशेने जात होती. त्याच वेळी धाड येथून मौंढाळाकडे जाणारी दुचाकी क्रमांक एम  एच-२८-एजी-५५१४ ही सहकार विद्या मंदिर नजीक आली. दोन्ही वाहने एकमेकांच्या समोर येताच वाहनांची जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार विष्णू काळे हे हवेत उडून रस्त्यावर आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच, त्यांच्या हातांना आणि पायांनाही गंभीर दुखापत झाली. उपचारास मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक विष्णू उर्फ विनोद काळे हे एक शिक्षक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या काळे यांचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. स्थानिक लोकांनी तातडीने धाड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत त्वरित घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर, मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. बातमी लिहेपर्यंत धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!